पंढरीतील मेहतर समाजाच्या गृहनिर्माण प्रकल्पास मुख्यमंत्र्यांकडून मंजुरी
नगरपालिकेचे दवाखानेही सुरू करण्याचे आदेश मनसे नेते दिलीप धोत्रे यांची माहिती

पंढरपूर(प्रतिनिधी)
पंढरपूर शहरातील मेहतर समाजाच्या गृहनिर्माण प्रकल्प उभारणीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांनी विशेष बाब म्हणून मंजुरी दिली असून, पंढरपूर शहरातील बंद असलेले सर्व नगरपालिकांचे दवाखाने सुरू करण्यास संबंधित विभागाला आदेश दिले असल्याची माहिती मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली आहे.
मागील १३६ वर्षापासून पंढरपूर येथे मेहतर समाज राहत आहे. या समाजाने मानवी विष्ठा हाताने उचलून, पंढरपूर शहर आणि चंद्रभागा वाळवंट स्वच्छ ठेवण्याचे काम केले आहे. आजदेखील संपूर्ण पंढरपूर शहर स्वच्छ करण्याचे काम या समाजातील लोक करत आहेत. या समाजातील कुटुंबांना राहण्यासाठी घरेही नाहीत. ही सर्व कुटुंबे आज देखील नगरपालिकेच्या जागेत पत्र्याच्या घरात राहत आहेत. या समाजाच्या वतीने घरासाठी वारंवार आंदोलने करण्यात आली, परंतु अदयाप पर्यंत या समाजाला न्याय दिला गेला नाही. या समाजासाठी घरे देण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने आदेश देऊनही, नगरपालिकेने जाणून बुजून दुर्लक्ष केले आहे. या समाजाच्या निवासस्थानासाठी नगरपालिकेकडे डीपीआर प्लॅन तयार असून, गेल्या १३६ वर्षापासून नगरपालिकेच्या हद्दीतील जागेत हा समाज एक ठिकाणी राहत आहे. वारंवार शासन दरबारी बैठक होऊन देखील, या समाजाला न्याय मिळाला नाही. हा समाज निस्वार्थपणे भाविकांना चांगल्या सुविधा पुरवत आहे. तरी याकामी मुख्यमंत्री यांनी जातीने लक्ष घालून, पंढरपूर शहरातील मेहतर समाजाच्या गृह प्रकल्पास मंजुरी द्यावी, तसेच पंढरीतील भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता
नगरपालिकेचे बंद पडलेले सर्व दवाखाने सुरू करावेत, यासाठी मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी मागणी केली होती.
मनसे नेते बाळा नांदगावकर आणि मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिले होते. यावर मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली असून, मेहतर समाजाच्या गृहनिर्माण प्रकल्पास मुख्यमंत्र्यांनी विशेष खास बाब म्हणून मंजुरी दिली आहे. तसेच नगरपालिकेचे बंद पडलेले सर्व दवाखाने सुरू करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले असल्याची माहिती दिलीप धोत्रे यांनी दिली आहे.