
पंढरपूर (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीचे अनेक किस्से आजवर प्रसिद्ध झाले आहेत. यात आणखी एका नव्या किस्याची भर पडली असून, यामुळे सामान्य नागरिकांचे डोके गरगरू लागले आहे. पाचशे रुपये विज बिल येणाऱ्या नागरिकांना तब्बल ५ हजार रुपयांपासून ३५ हजार रुपये इतके विजबिल महावितरण कंपनीकडून आकारण्यात आले आहे. याचा छावा क्रांतिवीर सेनेकडून निषेध नोंदवण्यात आला असून, प्रसंगी तीव्र आंदोलन छेडण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव येथे डोंबारी समाज वास्तव्यास आहे.या गरीब समाजाने रीतसर
वीज कनेक्शनही घेतली आहेत. त्यांना दरमहा ५०० रुपयांपासून १००० रुपयांपर्यंत विजबिल येत होते. मार्च महिन्याअखेरीस या प्रकारचे विज बिल येत राहिले. एप्रिल महिन्यापासून मात्र या वीजबिलाने अचानक उच्चांक गाठला. या नागरिकांना दरमहा ५ हजार ते ३५ हजार रुपयांपर्यंत वीज बिले येत गेली. याबाबत महावितरण कंपनीकडे तक्रारही करण्यात आली. सदोष वीजमीटर बदलून मिळण्याच्या तक्रारी महावितरणकडे करण्यात आल्या. परंतु महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले.
या प्रकरणाची दखल आता छावा क्रांतिवीर सेनेने घेतली असून, वाढीव वीज बिल दिलेल्या ८ ग्राहकांचे विजबिल कमी करून मिळण्याची विनंती महावितरण कंपनीकडे केली आहे. सदोष वीज मीटर बदलून,
विज बिल कमी करण्यात यावे, याबाबतचे निवेदन
शाखा अभियंत्यांना देण्यात आले आहे. प्रसंगी
तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही या सेनेकडून देण्यात आला आहे.
याप्रसंगी छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेश सह संपर्कप्रमुख गणेश माने, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष हर्षद भोसले, भंडीशेगाव शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष माने, विजय गाजरे, संतोष गावडे, दिलीप शिंदे, धर्मा पवार, भाऊसाहेब शिंदे, चंद्रकांत शिंदे, संजय शिंदे, राजू पवार, बापू शिंदे, अजय शिंदे, अंकुश शिंदे, युवराज शिंदे, बाळू शिंदे, रवी शिंदे, रमेश शिंदे, दिलीप शिंदे आदी
नागरिक उपस्थित होते.