
पंढरपूर (प्रतिनिधी)
महायुती सरकारने जाहीर केलेली ‘नमामि चंद्रभागा” योजना आतापर्यंत फक्त कागदावरच होती. चंद्रभागेच्या दूषित पाण्यामुळे भाविकांना मोठा त्रास होत होता.यामुळे भाविकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. उशिरा का होईना, आता या योजनेस सुरुवात झाली असून, घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी पाच कोटी रुपयांची निविदाही निघाली आहे. विठुरायाच्या भाविकांसाठी प्राण असणारी ही चंद्रभागा आतातरी निर्मळ होईल, अशी भावना भाविकांची झाली असून, भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
पंढरीतील विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यातून आणि सबंध देशातून दरवर्षी १ कोटीहून जास्त
भाविक पंढरीस भेट देतात. पंढरीत आल्यानंतर
चंद्रभागेत स्नान करून, चंद्रभागेचे तीर्थही प्राशन करतात. चंद्रभागेचे पाणी सध्या दूषित झाले असल्यामुळे, भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पंढरीतील श्री विठ्ठल मंदिराचा पुरातत्व खात्याच्या सल्ल्यानुसार जीर्णोद्धार सुरू आहे.
या कामामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मंदिर
चकाचक झाले आहे.
नमामि चंद्रभागा योजना जाहीर होऊन पाच वर्षाचा कालावधी लोटला. परंतु आजपर्यंत या योजनेला मुहूर्त लागला नव्हता. अखेर आता या योजनेस सुरुवात करण्यात आली असून, याचा पहिला टप्पा
आता पूर्णत्वास जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील घनकचरा व्यवस्थापन कामी पाच कोटी रुपयांची निविदा निघाली असून, या योजनेच्या कामास सुरुवात होण्याची आशा बळावली आहे.