आंध्र प्रदेशमध्ये दिव्यांगांना ६ हजार रुपयांची पेन्शन
राज्यातील दिव्यांगांचे दिवस कधी बदलणार ?

पंढरपूर (प्रतिनिधी)
आंध्रप्रदेश मध्ये चंद्राबाबू नायडू यांचे सरकार सत्तेवर आहे. सरकार सत्तेवर येताच, त्यांनी दिव्यांग बांधवांना प्रति महिना ६ हजार रुपये पेन्शन लागू करण्याचे आश्वासन पूर्ण केले आहे. महाराष्ट्रातील प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आ. बच्चू कडू यांनी या सरकारचे अभिनंदन केले आहे. आंध्रप्रदेशमध्ये दिव्यांगांना चांगले दिवस आले आहेत, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांना हे दिवस केव्हा पहावयास मिळणार? अशी चर्चा राज्यातील दिव्यांग बांधवांमध्ये सुरू आहे.
राज्यातील दिव्यांग बांधवांना प्रति महिना अनुदान सुरू आहे. हे अनुदान प्रतिमहिना १५०० इतके आहे. हे अनुदान मिळण्यातही कायम धरसोड होत असते. काही वेळा हे अनुदान चार महिन्यातून एकदा येते. राज्यात दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची नेमणूक करण्यात आली आहे. या विभागामार्फत दिव्यांग बांधवांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. परंतु या योजना राबवित असताना अथवा पदरात पाडून घेताना , दिव्यांग बांधवांची कसोटी लागत असते.