
ओबीसी कार्यकर्ते लक्ष्मण हाके यांच्या उपोषणस्थळी
सरकारचे शिष्टमंडळ गेले. शुक्रवारपासून दुसऱ्यांदा हे शिष्टमंडळ त्या ठिकाणी गेले असून, ही तर घडवून आणलेली बैठक होती. मराठा समाजाला आरक्षण मिळू द्यायचे नाही, यासाठी सरकारनेच ही बैठक घडवून आणली होती, असा घणाघात मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी केला.
गेल्या दहा दिवसापासून धनगर समाजाचे नेते, लक्ष्मण हाके हे जालना जिल्ह्यातील वडीगोद्री या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, अशी त्यांची मागणी आहे. यावर मनोज जरांगे पाटील यांनी सडकून टीका केली. आंदोलन हे मागण्या मान्य करून घेण्यासाठी असते.
यामध्ये स्वतःला काही न मागता, दुसऱ्याला देऊ नये, ही मागणी करता येत नसते. तरीसुद्धा सुरू असलेले हे आंदोलन सरकारने बसवले आहे.
शुक्रवारी आणि शनिवारी सरकारचे शिष्टमंडळ, ज्यामध्ये मंत्री गिरीश महाजन, धनंजय मुंडे,
छगन भुजबळ, पंकजा मुंडे, आ. गोपीचंद पडळकर, आ. विजय वडेट्टीवार आदींचा सहभाग होता.शिष्टमंडळाने आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांची उपोषणस्थळी भेट घेतली. यानंतर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, ओबीसीचे शिष्टमंडळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची समोरासमोर चर्चा घडवून आणण्याची गरज आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला शब्द दिला आहे की, मराठा समाजावर अन्याय होऊ देणार नाही, याशिवाय ओबीसी समाजासही धक्का लागू देणार नाही.