विधानपरिषद उपसभापती डॉ. गोऱ्हे यांची ऑनलाइन बैठक
आषाढीची कामे पाच जुलै पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना

पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूरचा आषाढी एकादशी सोहळा १७ जुलै रोजी पार पडणार आहे. या यात्रेसाठी पायी पालखी सोहळ्यासोबत, मोठ्या प्रमाणात वारकरी भव्य येणार आहेत. या भाविकांना पालखी मार्गावर व तळांवर, तसेच यात्रा कालावधीत पंढरपूर शहरात आणि परिसरात सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसेच त्यांना कोणतीही अडचण येऊ नये, याची दक्षता घेऊन संबंधित विभागांनी सर्व कामे पाच जुलैपर्यंत पूर्ण करावीत, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.
आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान तसेच जिल्हा प्रशासनासोबत ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी सूचना दिल्या. या ऑनलाईन बैठकीस जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वहाणे, अक्षय महाराज भोसले, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे घोडके तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की,
प्रत्येक शासकीय विभागांनी परस्परात समन्वय ठेवून काम करावे, पालखी मार्गावर रिंगण सोहळा व प्रदक्षिणा मार्गावर भाविकांना खडी टोचणार नाही, याची दक्षता घ्यावी. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पालखी मार्गाची कामे वेळेत करावीत. स्वच्छता कर्मचाऱ्यांना रेनकोटसह सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक साहित्याचा पुरवठा करावा. यात्रा कालावधीत पावसाळा असल्याने डास होण्याची शक्यता आहे, नगरपालिकेने डास प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात, शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा. आरोग्य विभागाने खाजगी हॉस्पिटलमध्ये राखीव बेडची उपलब्धता ठेवावी. आयसीयु बेडची संख्या वाढवावी. पालखी मार्गावर महिला कक्ष, चेंजिंग रूम, सॅनिटरी नॅपकिन आदींची व्यवस्था करावी. खाजगी बस स्थानकावर स्वच्छता, मुबलक शौचालय, तसेच सुरक्षा व्यवस्था ठेवावी. नदीपत्रात धोकादायक ठिकाणी माहिती फलक लावावेत. बसेसची तपासणी करून सुस्थितीत असण्याची खात्री करावी.
मंदिर समितीने विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी दर्शन रांगेत उभ्या असणाऱ्या भाविकांसाठी बैठक व्यवस्था करावी, आषाढी एकादशी दिवशी राजगिरा लाडूची संख्या वाढवावी, मुख्य दर्शनी मंडपात हवा खेळती राहील याची दक्षता घ्यावी, आषाढी यात्रेत नेमण्यात आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी यावेळी केले.
आषाढी सोहळ्यासाठी पालखीसोबत येणाऱ्या वारकरी भाविकांना पालखी मार्ग, विसावा तसेच पालखी तळांवर आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. वारकऱ्यांच्या सुरक्षेबाबत २५ हजार ५०० पोलीस आणि अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. ३४ आपत्ती प्रतिसाद प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून देण्यात आली.
जिल्हा परिषद प्रशासनाकडून पालखी मार्गावर वारकऱ्यांच्या सुविधेसाठी मंडप, महिला कक्ष, चेंजिंग रूम, वैद्यकीय व्यवस्था आदीबाबत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शिरीषक सरदेशपांडे यांनी माहिती दिली.