
- पंढरपूर (प्रतिनिधी)राज्याचा विकास साधण्यासाठी लोकाभिमुख प्रशासन राबविण्याच्या बाता , राज्यातील शासन करत आहे. गावच्या ग्रामपंचायतीकडे विकास निधी डायरेक्ट हस्तांतरित केलला जात आहे. परंतु हा निधी वापरताना , सरपंच आणि ग्रामपंचायतीपुढे पुन्हा हे निगरगठ प्रशासन हात आडवे करून उभे आहे . या प्रशासनाचा सामना करण्याची वेळ गावच्या सरपंचावर येऊन ठेपली आहे. मुख्यमंत्री साहेब ,
आता तरी लोकाभिमुख प्रशासनाचा डंका वाजविणे थांबवा , असे म्हणण्याची वेळ
गावच्या नागरिकांवर आली आहे. पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी गावचे सरपंच संजय साठे यांनी महाराष्ट्र दिनी उपोषण
आरंभल्याने , राज्यातील प्रशासनाचे भयावह चित्र पुन्हा समोर आले आहे.गाव आणि खेडी स्वयंपूर्ण झाली पाहिजेत , असा ध्यास राज्याच्या शासनकर्त्यांनी घेतला आहे. म्हणूनच ग्रामपंचायतींना जास्तीचे अधिकार देण्यात आले आहेत. परंतु ग्रामपंचायतीच्या ठरावास कचऱ्याची किंमत देणारे प्रशासन जोपर्यंत सरळ होत नाही , तोपर्यंत ग्रामविकासाचे स्वप्न स्वप्नच राहणार आहे.
लक्ष्मी टाकळी गावच्या ग्रामपंचायतीने गावातील दारूबंदी विषयीचा ठराव केला.
या ठरावाचा डंका संपूर्ण तालुक्यात पिटला गेला. सर्वच ग्रामपंचायतींनी असा ठराव करून , गावेच्या गावे दारू मुक्त करावीत , असे चिंतन सबंध तालुक्यातील नागरिकांमधून झाले.
गावच्या ग्रामपंचायतीने दारूबंदीचा ठराव केला तरीही येथील प्रशासनाचा ठराव मात्र वेगळाच होता .या गावातील दारू आणि ताडीची दुकाने
जोमाने सुरूच राहिली. ग्रामपंचायतीचा ठराव मात्र कागदावरच राहिला. हे चित्र लक्ष्मी टाकळी गावच्या ग्रामपंचायत सदस्यांसमोर आ वासून उभे राहिले.लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीकडून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम गेल्या तीन वर्षापासून हाती घेण्यात आले होते. मात्र गावातील पाईपलाईन काही नागरिकांनी अडविल्याने, सदरचे काम संथ गतीने सुरू आहे. याबाबत सरपंच संजय साठे यांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या. प्रशासनाने मात्र याकडे कायमच दुर्लक्ष केले. परिणामी येथील ग्रामस्थांना , पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. येथील दारू विक्री आणि पाणीटंचाईमुळे ग्रामस्थ आणि महिला वर्गातून विरोध वाढू लागला आहे.
परिणामी येथील सरपंच संजय साठे यांनी आक्रमक भूमिका घेत , प्रशासनाविरोधात उपोषणाचे हत्यार उपसले आहे. गुरुवार दि. १ मे या महाराष्ट्र आणि कामगार दिनी त्यांनी आंदोलनास सुरुवात केली आहे. येथील तहसील कार्यालयासमोर त्यांनी उपोषणास आरंभ केला आहे. गाव गावचे सरपंच आणि उपसरपंच त्यांच्या भेटीस येऊ लागले आहेत. गावच्या सरपंचावर ही वेळ येत असेल तर, सामान्य नागरिकाचा काय लाग ? अशी चर्चा सबंध तालुक्यातील नागरिकांमधून होऊ लागली आहे.
पंढरपूर तालुक्यात गावोगाव अवैध दारूधंदे सुरू आहेत. यातून राज्य उत्पादन शुल्क
आणि पोलिसांचे हात ओले होतं आहेत. यामुळे तक्रार करूनही , दारू धंदे जोमाने सुरू आहेत. यामुळे पैशा – पैशावर प्रशासनाचा नाच सुरू असल्याचे चित्र पंढरपूर तालुक्यात दिसत आहे. पंढरपूर तालुक्यातील एका सरपंचावर प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याची वेळ यावी , ही मोठी शोकांतिका आहे. सरपंच संजय साठे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांचे समर्थक आहेत. तरीही त्यांच्यावर उपोषणाची वेळ यावी ,यावरून येथील प्रशासन किती पावरफुल्ल आहे , याचा अंदाज आल्याशिवाय राहत नाही.