
पंढरपूर (प्रतिनिधी)
ध्येयाच्या दिशेने पळणारा माणूस ध्येयाजवळ कधी पोहोचला ,हे त्यालाही समजत नाही. गेल्या पाच वर्षापासून मोहोळ तालुक्याची आमदारकी
मिळवण्यासाठी अहोरात्र झटणारे उद्योजक राजू खरे यांना अखेर राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचा ट्रॅक सापडला आहे. आता त्यांची गाडी सुसाट विधानभवनाच्या दिशेने धावणार यात कोणतीही
शंका उरलेली नाही.
मागील विधानसभा निवडणूक काळापासून
राजू खरे यांना मोहोळची आमदारकी खुणावू लागली ,आणि त्यांचा प्रवास त्या दिशेने सुरू झाला. गावागावात जाऊन एक एक समर्थक तयार करण्यात राजू खरे गुंतू लागले. त्यांच्या कामाच्या आवाक्याची जाणीव प्रथमतः कोणालाच नव्हती. आमदारांनाही शक्य नसणारी कामे , जसजशी त्यांच्या हातून होत गेली. त्यांच्याभोवती कार्यकर्त्यांचा गराडा पडू लागला. गोपाळपूर येथील फार्म हाऊस दर शनिवारी आणि रविवारी फुलू लागले. बघता बघता सबंध मोहोळ तालुक्यात राजू खरे यांच्या कामाची चर्चा होऊ लागली.
साहजिकच अनेक प्रतिष्ठित नागरिक, ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच आणि अनेक सरपंच मंडळींनी राजू खरे यांच्याकडून मोठमोठी कामे करून घेतली. यामध्ये करोडो रुपयांची विकास कामे मंजूर झाली. अनेक कामे पूर्णही झाली. बघता विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली.
राजू खरे हे मूळ शिवसेना शिंदे गटाचे. महायुतीत मोहोळ विधानसभेची जागा, राष्ट्रवादी अजित पवार काँग्रेसच्या वाट्याला गेली. यामुळे शिवसेना शिंदे गटातून त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. पाठीमागील काळात सोशल मीडियाद्वारे राजू खरे यांची थट्टाही करण्यात आली. परंतु यामुळे कुचंबून जाऊन थांबतील ते राजू खरे कसले ? राजू खरे यांनी राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसकडे आपला मोर्चा वळवला. सुरुवातीला स्वतः हेलपाटे घातले. या संधीनेही त्यांना हुलकावणी दिली. राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसने सिद्धी रमेश कदम यांना उमेदवारी महाल केली. मोहोळ तालुक्यात भूमिपुत्राला संधी मिळावी, अशी येथील मतदारांची इच्छा होती. मोहोळ तालुक्यातील प्रतिस्पर्धी राजकीय नेत्यांमध्ये यामुळे खळबळ उडाली.
या राजकीय नेतेमंडळी आणि राजू खरे यांच्यामध्ये मोठी राजकीय खल झाली. जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांची भेट घेण्यात आली. यामागील तथ्य बळीराम काकांच्या ध्यानात आणून देण्यात आले. आणि ही मंडळी उमेदवार बदलण्याच्या मागणीसाठी बारामतीकडे रवाना झाली. राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांना पटवून सांगण्यात ही मंडळी यशस्वी झाली. आणि शरद पवार यांनी राजू खरे यांच्या हाती तुतारी दिली.
राजू खरे हे आता प्रस्थापित आमदाराचे प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत. सबंध राज्यात ज्या तुतारीचा बोलबाला आहे, ती तुतारी आता त्यांच्या हातात आहे. तालुक्यातील संपूर्ण विरोधकांची टीम आज त्यांच्यासोबत आहे. एक एक मतदार जोडत गेलेल्या राजू खरे यांच्या पाठीशी आता मोठा जनसमुदाय आहे.