
पंढरपूर (प्रतिनिधी)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे बुधवारी मंगळवेढ्यात येणार असून, मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांच्या प्रचारसभेस संबोधित करणार आहेत. ही जाहीर सभा येथील शिवप्रेमी चौक, आठवडा बाजार येथे सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आली असून, या सभेस हजारो नागरिकांची उपस्थिती राहणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे.
राज्यात सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपले उमेदवार जाहीर केले. मनसे नेते दिलीप धोत्रे यांना, पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. उमेदवारी जाहीर केल्यापासूनच दिलीप धोत्रे हे कामास लागले होते. त्यांनी आजपर्यंत प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. राज्यातील मनसे उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांनी झंजावाती प्रचार सभा घेण्यास सुरुवात केली असून , बुधवार दि. ६ नोव्हेंबर रोजी ते मंगळवेढा येथे येत आहेत.
दिलीप धोत्रे हे मनसेचे प्रमुख उमेदवार असून,
राज ठाकरे हे पहिल्या फेरीतच त्यांच्या प्रचारसभेस येत आहेत. यापूर्वीही मंगळवेढ्यात भरवण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी अमित ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती. मनसे नेते आणि उमेदवार दिलीप धोत्रे यांनी निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच हिंदू बांधवांना काशी, अयोध्या, तुळजापूर यासारख्या तीर्थांचे दर्शन घडवले होते. याशिवाय मुस्लिम बांधवांसाठी अजमेर यात्रेचे आयोजन केले होते. बौद्ध बांधवांसाठी नागपूर दीक्षाभूमीची सहल काढली होती. यामुळे दिलीप धोत्रे यांची उमेदवारी, तळागाळापर्यंत पोहोचली आहे. यामुळे या उमेदवारीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. यामुळेच मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा दौरा
मंगळवेढा येथे होत आहे.