राज ठाकरे यांच्या मंगळवेढ्यातील सभेची वेळ बदलली
बुधवारी दुपारी १ वाजता होणार जाहीर सभा -दिलीप धोत्रे

पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे,यांच्या प्रचारासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे हे मंगळवेढ्यात येत आहेत.बुधवार दि. ६ नोव्हेंबर रोजी त्यांचा मंगळवेढा दौरा कायम झाला आहे.या दिवशी दुपारी एक वाजता त्यांची जाहीर प्रचारसभा पार पडणार आहे, याबाबतची माहिती मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्याकडून देण्यात आली आहे.
राज ठाकरे यांच्या प्रचार सभेच्या वेळेत अचानक बदल झाला असल्याची माहिती , मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांच्याकडून देण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघात दिलीप धोत्रे यांची उमेदवारी दीड महिन्यापूर्वी जाहीर केली होती. राज्यात अनेक मनसेचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून, यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यभर प्रचारदौरा राबवला आहे. पहिल्या टप्प्यातच पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची निवड केली आहे. यामुळे दिलीप धोत्रे यांची उमेदवारी चर्चेत आली आहे.
बुधवारी सायंकाळी ५ वाजता होणारी ही जाहीर प्रचारसभा, दुपारी १ वाजताच सुरू होणार असल्याची माहिती दिलीप धोत्रे यांनी दिली आहे. ही प्रचारसभा येथील शिवप्रेमी चौक ,आठवडा बाजार येथे होणार आहे. या सभेस हजारो नागरिकांची उपस्थिती राहणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे.
दिलीप धोत्रे हे मनसेचे प्रमुख उमेदवार असून,राज ठाकरे हे पहिल्या फेरीतच त्यांच्या प्रचारसभेस येत आहेत. यापूर्वीही मंगळवेढ्यात भरवण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी अमित ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती. मनसे नेते आणि उमेदवार दिलीप धोत्रे यांनी निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच हिंदू बांधवांना काशी, अयोध्या, तुळजापूर यासारख्या तीर्थांचे दर्शन घडवले होते. याशिवाय मुस्लिम बांधवांसाठी अजमेर यात्रेचे आयोजन केले होते. बौद्ध बांधवांसाठी नागपूर दीक्षाभूमीची सहल काढली होती. यामुळे दिलीप धोत्रे यांची उमेदवारी, तळागाळापर्यंत पोहोचली आहे. यामुळे या उमेदवारीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. यामुळेच मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा दौरा मंगळवेढा येथे होत आहे.