
पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर विधानसभेची निवडणूक दुरंगी होण्याची चिन्हे असताना , अचानक या निवडणुकीने वेगळेच वळण घेतले आहे. महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याने , या मतदारसंघात चौरंगी सामना पहावयास मिळणार आहे.
भाजपाचे आ. समाधान अवताडे , राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसचे उमेदवार अनिल सावंत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यात आल्याने ही निवडणूक चौरंगी होणार आहे.
महाविकास आघाडीत पंढरपूर विधानसभेची जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसच्या वाट्याला आली होती. परंतु या ठिकाणी काँग्रेसने आपली उमेदवारी जाहीर केली. लगोलग राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानेही अनिल सावंत यांना उमेदवारी दिली. यामुळे या मतदारसंघात महाविकास आघाडीचे दोन आणि महायुतीमधील भाजपचा एक तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक ,असे चार उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
सोमवार दि. ४ नोव्हेंबर या उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी, १४ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. यामध्ये वसंतराव देशमुख, शैलजा सावंत, चंद्रकांत बागल, देवानंद गुंड, आदित्य फत्तेपूरकर आदींसह इतर. ९ जणांचा समावेश आहे.
पंढरपूर विधानसभा निवडणूक रिंगणात महायुती(भाजप),राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी (शप) काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यासह इतर काही राजकीय पक्षांच्या उमेदवारांनीही उमेदवारी दाखल केली आहे. बहुजन समाज पार्टीकडून दत्ता वाडेकर, वंचित बहुजन आघाडीकडून अशोक रंगनाथ माने, राष्ट्रीय समाज पक्षाकडून पंकज हरिचंद्र देवकते आणि अखिल भारतीय सेनेकडून सुदर्शन रामचंद्र खंदारे आदींनीही निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. यामुळे पंढरपूर मतदारसंघात २४ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे ठाकल्याचे दिसत आहे.
पंढरपूर विधानसभा निवडणूक जरी चौरंगी होत असली तरीही , यातील एक उमेदवार मोठ्या अडचणीत येणार आहे. अडचणीत येणाऱ्या उमेदवारीमध्ये कोणाचा नंबर लागतो, हे येणारा काळच ठरवणार आहे.