
पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूरमध्ये भाविकांच्या निवासासाठी बांधण्यात आलेल्या, श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवासातील
उपहारगृह मंदिर समितीस चालवावे लागणार आहे. मंदिर समितीकडे हे उपहारगृह आल्याने, भाविकांना माफक दरात भोजन उपलब्ध होईल, असे मत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी व्यक्त केले आहे.
पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने, भक्त निवास बांधण्यात आले आहे. भक्ती मार्गावर असणाऱ्या या भक्त निवासामध्ये उपहारगृहाची देखील निर्मिती करण्यात आली आहे. हे उपहारगृह चालवण्यास देणेकामी इ लिलाव राबवण्यात आला होता. तथापि सदर लिलावात सर्वच लिलावधारकांनी माघार घेतल्याने, सदरचे उपहारगृह मंदिर समितीमार्फत चालवण्याचा निर्णय, मंदिर समितीने घेतला होता.
त्यानुसार शुक्रवार दि. २८ जूनपासून हे उपहारगृह सुरू करण्यात आले आहे. भाविकांना माफक दरात भोजन मिळणार असल्याची माहिती, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे.