
पंढरपूर (प्रतिनिधी)
सोलापूर जिल्ह्यातील इतर तालुक्यांप्रमाणेच, पंढरपूर शहर आणि तालुक्यासाठी क्रीडा संकुल उभारण्यास मंजुरी द्यावी, यासाठी तात्काळ भरीव निधीची तरतूद करावी, अशी मागणी मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
पंढरपूरची ओळख दक्षिणकाशी तसेच धार्मिक ठिकाण म्हणून असली तरीही, पंढरपूरने शिक्षण क्षेत्रात मोठे पाऊल टाकले आहे. म्हणून तर या ठिकाणी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी दरवर्षी येतात. यामुळे पंढरीची ओळख आता शैक्षणिक हब म्हणूनही झाली आहे. येथील शिक्षण संस्थामधील क्रीडापटूंसाठी आवश्यक त्या सोयी सुविधा, याच ठिकाणी निर्माण होणे गरजेचे आहे.
पंढरपूर शहर आणि तालुक्यातील अनेक युवा क्रीडापटूंनी ऑलिंपिक पर्यंत मजल मारली आहे.
अनेक कुस्तीगीरांनी कुस्तीची मैदाने गाजवली आहेत. पंढरपूर तालुक्यात क्रीडा विभागाकडून दरवर्षी क्रीडा स्पर्धा भरवल्या जातात. एखाद्या शाळेच्या मैदानावर या स्पर्धा पार पडतात. पंढरपूर शहर व तालुक्याची लोकसंख्या सहा ते सात लाख असून, या तालुक्यात अनेक उच्च शिक्षण संस्था असतानाही या तालुक्यात आजपर्यंत क्रिडा संकुल झालेले नाही.
नुकतेच राज्य सरकारने सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील क्रीडा संकुलासाठी ४३ कोटी रुपये इतका निधी दिला आहे. अक्कलकोट तालुका क्रीडा संकुलही असेच भव्य दिव्य होत असून, क्रीडा संकुलासाठी २८ कोटी रुपये इतका निधी मंजूर केला आहे. याचबरोबर जिल्ह्यातील माढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर, क्रीडा संकुलासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला आहे.
पंढरपूर शहरात भव्य क्रीडा संकुल होणे गरजेचे आहे, जेणेकरून येथील क्रीडापटूंना या ठिकाणी सराव करता येईल. त्याचबरोबर विविध शालेय महाविद्यालयीन स्पर्धा पार पडतील. सर्व सुविधांनी युक्त क्रीडा संकुल उभारल्याने, क्रीडा क्षेत्राकडे विद्यार्थी आणि तरुणांची ओढ वाढेल. यासाठी पंढरपूर शहरात भव्य क्रीडा संकुल उभारण्यास मंजुरी मिळावी, आणि निधीचीही तरतूद व्हावी, अशी मागणी मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
पंढरपूर शहर आणि तालुक्यात आजवर अनेक क्रीडापटूंनी नाव कमावले आहे. या ठिकाणी क्रीडा संकुल उभारावे , यासाठी कोणीही पाठपुरावा केला नव्हता. मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी क्रीडा संकुलाची मागणी करून, अनेक उदयोन्मुख खेळाडूंच्या मागणीस वाचा फोडली आहे.