
पंढरपूर (प्रतिनिधी)
सोलापूर जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी
सोलापूर जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करत, सोमवारी त्यांच्या मागण्या मांडल्या. सरकारने मापात पाप न करता, स्वस्त धान्य दुकानदारांना धान्याचा पुरवठा करावा,महागाई निर्देशांकाप्रमाणे मार्जींनमध्ये वाढ करावी, यासह इतर अनेक मागण्या या दुकानदारांकडून करण्यात आल्या.
स्वस्त धान्य दुकानदाराने कमी माल दिला तर, नागरिक ओरड करत सुटतो. जिल्ह्यातील रास्त भाव दुकानदारांनी केलेल्या मागण्यांमुळे या गोष्टीची उकल झाली आहे. स्वस्त धान्य दुकानदारांनी सोलापूर जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करत आपल्या मागण्या, अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाकडे पाठवल्या. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. यावेळी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय मंडलिक, उपाध्यक्ष रमजान नदाफ, रामेश्वर महिमकर आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार तसेच केरोसीन परवानाधारक महासंघ पुणे यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. याआधी या मागण्या १० जानेवारी २०२४ रोजी,
अन्न व नागरी पुरवठा मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्यासमोर मांडण्यात आल्या होत्या. यासंदर्भात त्यांच्यासोबत बैठकही झाली होती. परंतु आजतागायत या मागण्या संदर्भात, कोणतीही कारवाई झाली नाही. सबब या मागण्या पुन्हा मांडण्यात आल्या.
स्वस्त धान्य दुकानदारांना पुरवण्यात येणारे धान्य कायमच कमी येते. प्रत्येक गोणीतील धान्य प्रतिक्विंटल ५८० ग्रॅम वाढवण्यात यावे. स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात मार्जिनमध्ये प्रति क्विंटल पंधरा रुपयांची वाढ करावी. प्रत्येक गोणीमागे दोन किलो धान्य हाताळणी पोटी सोडून देण्यात यावे, या मागण्या या संघटनेकडून मांडण्यात आल्या.
याप्रसंगी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हा सचिव मारुती अंधारे, जिल्हा सहसचिव सोमनाथ पवार, जिल्हा संपर्कप्रमुख दिलीप काजळे, कार्याध्यक्ष गणेश बागल यांच्यासह महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसीन परवानाधारक संघ पुणे, यांचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.