सामाजिक

पुण्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाचे थैमान

खडकवासला आतून विसर्ग वाढवला भिडे पूल पाण्याखाली

पुणे (प्रतिनिधी)
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. यामुळे जिल्ह्यातील धरणसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. यात टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला या धरण साखळीत ८५.५९ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून तब्बल २२ हजार ८८० क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पाण्याचा विसर्ग आणखी वाढल्यास पुन्हा घरात पाणी शिरेल, या भीतीने नदीकाठी राहणाऱ्या पुणेकरांची धडधड वाढली आहे.

चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जुलैअखेर दमदार पाऊस होत असल्याने, शहराला पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. मात्र दमदार पावसामुळे पुण्यातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने, बाबा भिडे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या परिसरातील रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

*खडकवासला धरण साखळीत पावसाचे थैमान*

जून महिन्यात पावसाने ओढ दिली होती. जुलैच्या मध्यानंतर दमदार पाऊस बरसला, आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली. खडकवासला धरण साखळीतही पावसाने थैमान घातले आहे. रविवारी पानशेत धरणातून पहिल्यांदाच ४७१२ क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला. तर, धरणांच्या परिसरात संततधार कायम असल्याने रविवारी खडकवासलामधून पुन्हा विसर्ग सोडण्यात आला.

*खडकवासलातून २२ हजार ८८० क्युसेकने पाण्याचा विसर्ग*

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात सोमवारी सकाळी ९ वाजता २२ हजार ८८० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी-अधिक करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत, असा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

*पानशेत धरणातून १५ हजार १३६ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग*

मुसळधार पावसामुळे पानशेत धरणाच्या पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रविवारी पानशेत धरणातून पहिल्यांदाच ४७१२ क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला. तर आज पहाटे चार वाजता हा विसर्ग १५ हजार १५६ क्यूसेकने वाढवण्यात आला आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close