दर्शन रांगेत घुसखोरी करणाऱ्या वर होणार कारवाई
प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केले प्रतिबंधात्मक आदेश जारी

पंढरपूर (प्रतिनिधी)
आषाढी शुद्ध एकादशी सोहळा येत्या १७ जुलै रोजी होणार असून, आषाढी यात्रेचा कालावधी ६ जुलै ते २१ जुलै २०२४ असा आहे. या यात्रा सोहळ्याच्या कालावधीत, लाखो भाविक श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला येत असतात. दर्शन रांगेत घुसखोरीमुळे, अनुचित प्रकार घडून चेंगराचेंगरी अथवा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यासाठी दर्शन रांगेत घुसखोरीस प्रतिबंधासाठी, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६६३(२) अन्वये उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी आदेश पारित केले आहेत.
आषाढी यात्रा कालावधीत लाखो भाविक दर्शनासाठी पंढरीत येत असतात. यावेळी दर्शनासाठी अनेक तास भाविक दर्शन रांगेत उभे असतात. भाविकांना दर्शन सुलभरीत्या होण्यासाठी, दर्शन रांगेचे व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. काही इसमा मार्फत दर्शन रांगेत घुसखोरी होत असल्याबाबत, प्रसारमाध्यमातून आणि भाविकांच्या तक्रारीतून निदर्शनास आले आहे. या गोष्टीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक आदेश पारित करण्यात आले आहेत.