मोहोळचा उमेदवार बदलला, अखेर राजू खरेंच्या हाती तुतारी
शरद पवार यांचे मन वळवण्यात विरोधकांना यश

पंढरपूर (प्रतिनिधी)
मोहोळ विधानसभा मतदारसंघात आता राजू खरे हे राष्ट्रवादी (शप) काँग्रेसचे उमेदवार असून, सिद्धी रमेश कदम यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. मोहोळमधील विरोधकांनी सोमवारी बारामती येथील गोविंद बागेत तळ ठोकला. एकदिलाने काम करून उमेदवार निवडून आणण्याची प्रतिज्ञा, शरद पवार यांच्यासमोर केली. आणि राजू खरे हे राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले. याचा आनंद खरे समर्थकांनी घेतला असून, मंगळवारी खरे आपल्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
सोमवारी मोहोळ मतदारसंघात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या. मोहोळ मतदार संघातील विरोधक नागनाथ क्षीरसागर, उमेश पाटील, सीमाताई पाटील, रमेश बारसकर यांनी जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे यांना घेऊन बारामती गाठली. गोविंद बागेत दिवसभर तळ ठोकला. एकदिलाने काम करून खरे यांना निवडून आणू, असा विश्वास शरद पवार यांना दिला. अखेर सोमवारी सायंकाळी शरद पवार यांनी येथील उमेदवारी बदलण्यास होकार दिला. तातडीने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोहोळ मतदारसंघातील राष्ट्रवादीचा उमेदवार बदलल्याचे पत्र येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नावे दिले. रात्री उशिरा मोहोळमधील ही टीम मोहोळला दाखल झाली.
दरम्यान राष्ट्रवादी (शप) काँग्रेसचे नवीन उमेदवार
राजू खरे हे मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे.