
पंढरपूर (प्रतिनिधी)
वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या अनिलनगर परिसरातील ड्रेनेज बांधणीच्या कामाला सुरुवात झाली. आणि हे काम आमच्यामुळेच असा होरा मिरवण्यास अनेक राजकारण्यांनी सुरुवात केली. या कामाची पाहणी संजय ननवरे यांच्याकडून करण्यात आली. यावेळी त्यांनी आ.समाधान अवताडे आणि येथील महिला भगिनींचे आभार मानले.
पंढरपूर शहरातील कैकाडी महाराज मठ, झेंडे गल्ली, भुयाचा मारुती, काशीकपडे गल्ली आदी परिसरातील नागरिकांना पावसाळ्यात मोठा त्रास सहन करावा लागत होता. पावसामुळे ड्रेनेजचे घाण पाणी, अनेक नागरिकांच्या घरात घुसत होते. या प्रश्र्नी येथील महिला वर्गाने अनेकदा आवाज उठवला होता. यावर समाजसेवक संजय बाबा ननवरे यांनी पुढाकार घेत, ही माहिती आ. समाधान आवताडे यांना सांगितली होती. आ. अवताडे यांनी याबाबत नगरपरिषद प्रशासनास सुनावले होते. तत्कालीन नगरपरिषद मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी येथील नागरिकांनी सहा महिने संयम ठेवावा, पूर्ण काम मार्गी लावतो असे सांगितले होते. यावर येथील नागरिकांनी कानावर हात ठेवले होते.
अखेर या समस्येच्या सोडवणुकीला मागील महिन्यापासून सुरुवात झाली असून, भूयाचा मारुती ते मांडव खडकी या दरम्यान ड्रेनेज बांधण्याचे काम सुरू झाले आहे. सुमारे ७७ लाख रुपयांचे हे काम, आ. समाधान अवताडे यांच्यामुळे झाले असल्याची माहिती समाजसेवक संजय ननवरे यांनी दिली आहे. तर आ. समाधान आवताडे यांच्या मते हे काम संजय ननवरे यांच्या पाठपुराव्यामुळेच झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.
अनिलनगर परिसरात सांडपाण्याची मोठी समस्या होती. ही समस्या या कामामुळे नाहीशी होणार आहे. अत्यंत दाट असलेल्या या झोपडपट्टीत मोठे काम सुरू झाल्यामुळे, अनेक राजकारण्यांनी डोके वर काढले आहे. हे काम आमच्यामुळेच झाले असल्याच्या बाता त्यांच्याकडून मारल्या जात आहेत. यावर समाजसेवक संजय ननवरे यांनी टीकेची झोड उठवली असून, ज्यांच्यामुळे हे काम झाले आहे त्यांनी पुरावे घेऊन पुढे यावे असे आवाहन केले आह.