
पंढरपूर (प्रतिनिधी)
लोकसभा निवडणुकीतील मानापमान नाट्य खा. प्रणिती शिंदे यांनी आयोजित केलेल्या कृतज्ञता सोहळ्यात रंगल्याचे दिसून आले.
या सोहळ्याच्या तयारीची जबाबदारी कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांवर देण्यात आली होती. यामध्येच माशी शिंकली आणि भगीरथ भालके समर्थक
आक्रमक झाले.
लोकसभा निवडणुकीत पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाची जबाबदारी भगीरथ भालके यांच्यावर देण्यात आली होती. यावेळी काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांना मानाची वागणूक मिळाली नव्हती. याची खदखद या पदाधिकाऱ्यांच्या मनात नक्कीच होती. लोकसभा निवडणूक पार पडली. निवडणुकीत प्रणिती शिंदे विक्रमी मताधिक्यांनी निवडून आल्या. दोन वेळा पराभूत होऊन तिसऱ्यांदा काँग्रेसला हे यश प्राप्त झाले आहे. यामुळे आनंदीत होऊन खा. प्रणिती शिंदे यांनी ठिकठिकाणी कृतज्ञता मेळावे आयोजित केले आहेत. पंढरपूरमध्येही हा मेळावा गुरुवारी येथील दाते मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याची जय्यत तयारी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली होती.
या मेळाव्याच्या ठिकाणी व्यासपीठावर बॅनर बनवण्यात आला होता. या बॅनरवर कै.आ. भारत भालके अथवा भगीरथ भालके यांचा फोटो देण्यात आला नव्हता. यावरूनच भगीरथ भालके समर्थक आक्रमक झाले. त्यांनी दाते मंगल कार्यालयाबाहेर येऊन घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. खा. प्रणिती शिंदे यांच्या गाडी पुढेही या घोषणा सुरू होत्या. यावर खा. प्रणिती शिंदे यांनी या समर्थकांची समजूत काढली, आणि भगीरथ भालके यांच्या नावाचा जयजयकार करत सर्व समर्थक व्यासपीठाकडे निघाले. भगीरथ भालके यांनी मात्र समर्थकांनी केलेल्या या राड्याबद्दल खा. प्रणिती शिंदे यांच्यापुढे दिलगिरी व्यक्त केली.