जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघ शिवसेना लढवणार -महेश साठे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही याबाबत कळवले

पंढरपूर (प्रतिनिधी)
सोलापूर जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघ पूर्वापार शिवसेनेच्या वाट्याला आले आहेत.
लोकसभा निवडणुकीत दोन्ही मतदारसंघ भाजपकडे गेल्याने, या पाच तालुक्यात विधानसभा निवडणुका शिवसेनेकडून नेटाने लढवल्या जाणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख महेश साठे यांनी दिली आहे.
लोकसभा निवडणूक निकाल लागताच, सर्वच पक्षांची नजर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीकडे लागली आहे. दोनच दिवसापूर्वी शिवसेना जिल्हाध्यक्ष महेश चिवटे यांनी विधानसभा निवडणुकीबाबत वक्तव्य केले होते. जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघ शिंदे शिवसेनेकडून लढवण्यात येणार असून, ही निवडणूक संपर्कप्रमुख महेश साठे यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात येणार असल्याचा खुलासा केला होता. याबाबत सर्वच तालुकाप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी पत्राद्वारे कळवले आहे. याबाबत शिवसेना संपर्कप्रमुख महेश साठे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनीही या गोष्टीला दुजोरा दिला आहे.
लोकसभा निवडणुकीत माढा आणि सोलापूर हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ भाजपकडून लढवण्यात आले. यावेळी शिंदे शिवसेनेने भाजपाला मोठी साथ दिली. आता शिवसेनेच्या वाट्याला येणारे सोलापूर शहर मध्य, करमाळा, माढा, सांगोला आणि मोहोळ विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडून लढवले जाणार आहेत. या मतदार संघात शिवसेनेकडे तगडे उमेदवार असून, उमेदवार आयात करण्याची कोणतीही गरज नाही.