
पंढरपूर (प्रतिनिधी)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राबवण्यासाठी सरकारने कंबर कसली असून, याकामी प्रशासनासही दक्ष राहण्याचे आदेश दिले आहेत. यामुळेच या योजनेचा लाभ घेऊ पाहणाऱ्या महिलेला कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी पंढरपूर तहसील कार्यालयाकडून हेल्पलाइन नंबर जाहीर करण्यात आला आहे. या महिलेने मदतीसाठी ०२१८६- २२३५५६ या क्रमांकावर संपर्क साधावा,
असे आवाहन पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगुटे
यांच्याकडून करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही शासनाची महत्त्वकांक्षी योजना आहे. याद्वारे पात्र लाभार्थी महिलेस दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येणार आहेत. तालुक्यातील एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही, याकरता तालुका प्रशासन स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने अहोरात्र काम करीत आहे. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, स्वावलंबीकरण आणि त्याला आत्मनिर्भर बनवण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी महिलांनी तात्काळ अर्ज करावेत, असे आवाहनही तहसीलदार सचिन लंगुटे यांच्याकडून करण्यात आले आहे.
या योजनेकरिता तालुक्यातून सुमारे ९५ हजार महिलांनी अर्ज दाखल केले आहेत त्यापैकी ७० हजार लाभार्थ्यांना मान्यता देण्यात आली आहे. उर्वरित २५ हजार लाभार्थ्यांची छाननी येत्या दोन दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे. यापूर्वी पात्र ठरलेल्या महिलांना १४ ऑगस्टपासून प्रत्यक्ष लाभ मिळण्यास सुरुवात झाल्यामुळे, महिला वर्गात समाधानाची भावना व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या वतीने प्राप्त प्रत्येक अर्जाची छाननी करण्यात आली. छाननीअंती पात्र ठरलेल्या महिलांच्या बँक खात्यात १४ ऑगस्टपासून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून प्रत्येकी तीन हजार रुपये जमा करण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी समाधान नागणे यांनी दिली आहे.