
पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर एमआयडीसी उभारणीबाबत गेल्या काही दिवसात मोठे राजकारण चालले होते. ही एमआयडीसी मेंढापूर येथे उभारण्याचा मानस आ. रणजीतसिंह मोहिते पाटील यांचा होता. अभिजीत पाटील यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील जागा औद्योगिक क्षेत्रासाठी देण्याचे घोषित केले होते.
प्रत्येकजण आपापल्या परीने या संदर्भात राजकारण करीत होते. परंतु बुधवार दि. २२ ऑगस्ट रोजी उद्योग मंत्रालयाने कासेगाव येथील सरकारी जमिनीस औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित केले, आणि एमआयडीसी संदर्भातील प्रश्नात आ. समाधान अवताडे यांनी बाजी मारल्याचे दिसून आले.
कासेगाव येथील सरकारी जमीन औद्योगिक क्षेत्र म्हणून उद्योग मंत्रालयाकडून घोषित करण्यात आली असल्याची माहिती खुद्द आ. अवताडे यांनी दिली. पंढरपूर एमआयडीसी प्रश्नात सुरुवातीपासूनच
आ. अवताडे यांनी लक्ष केंद्रित केले होते. दोन वर्षापासून सतत पाठपुरावा केला होता. मागील वर्षी कासेगाव येथील सरकारी जमिनीची पाहणी औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केली होती.
यानंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी पंढरपूर एमआयडीसी साठी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील जमीन देण्याची हमी राज्य सरकारला दिली होती. या जागेबाबतचे महत्त्वही पटवून दिले होते.
पंढरपूर एमआयडीसी हा मुद्दा मागील अनेक दशकापासून धुमसत आहे. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव तसेच अंतर्गत राजकीय कुरघोडीमुळे ही
औद्योगिक वसाहत रखडली होती. गेल्या तीन वर्षापासून आ. समाधान अवताडे यांनी या प्रश्नाचा पाठपुरावा केला. पंढरपूरमध्ये औद्योगिक वसाहत निर्माण झाल्यास, येथील हजारो बेरोजगार युवकांना रोजगार मिळणार आहे. पंढरपूर एमआयडीसी उभारणाऱ्या नेत्याच्या पाठीशी येथील जनताही
उभारणार असल्याची चर्चा मागील काही वर्षापासून
मतदारसंघात होत आहे. यासाठीच मोहिते पाटील बंधूंनी खासदारकीची निवडणूक जिंकताच मेंढापूर येथे एमआयडीसी उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना बोलावून येथील जागेची पाहणीही केली होती. परंतु आ. अवताडे यांनी त्यांचे सर्वस्व पणाला लावून
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील कासेगाव येथे एमआयडीसी उभारण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. अखेर त्यांच्या प्रयत्नास यश येऊ लागल्याचे दिसत आहे.