दिव्यांग शिबिरात १८३२ रुग्णांनी नोंदवला सहभाग
पंढरपूर येथे दिव्यांग शिबिर मोठ्या थाटात संपन्न

पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय येथे दिनांक १९ व २० ऑगस्ट २०२४ रोजी महसूल विभाग, पंचायत समिती पंढरपूर, उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर व दिव्यांग कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तालुक्यातील १ हजार ८३२ दिव्यांग व्यक्तींनी सहभाग नोंदवला.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे दोन दिवस तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसिलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी सुशिल संसारे तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. महेश सुडके व वैश्यपायन वैद्यकीय महाविद्यालयाचे तज्ञ डॉक्टर यांच्या उपस्थितीत हे शिबिर यश्वस्वी पार पडले.
या शिबिरात दृष्टी दोष २४२, श्रवण दोष ३०७, बौध्दीक अपंगत्व ३८७, अस्थिव्यंग ७८०, लहान मुलांचे व्यंग १२० अशा विविध व्यंगांची तपासणी करण्यात आली असून, यामध्ये पात्र लाभार्थ्यांना घरपोच प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. दिव्यांगांना शिबिराच्या ठिकाणी येण्यासाठी व जाण्यासाठी वाहन व्यवस्था, व्हील चेअरची व्यवस्था, वॉटर प्रुफ मंडप, स्वच्छ पिण्याचे पाणी, नाश्ता, जेवण, स्वच्छतागृह आदी व्यवस्था करण्यात आली होती. दिव्यांगांसाठी असणाऱ्या शासनाच्या विविध योजनांच्या लाभांची माहिती व्हावी, यासाठी माहितीचे बुकलेट तयार करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी विविध विभागाच्या वतीने माहितीचे स्टॉल लावण्यात आले होते.
सोलापूर जिल्हयातील तालुकानिहाय ग्रामिण रुग्णालय तथा उप जिल्हा रुग्णालय अशा एकुण २५ ठिकाणी दिव्यांग बोर्डाच्या तज्ञ डॉक्टरांमार्फत एकूण १५ हजार ६६६ व्यक्तींची दिव्यांगत्व तपासणी व निदान करून पात्र दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र (UDID CARD) स्पिड पोस्टने घरपोच देण्यात येणार आहे. तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या प्रचार प्रसिध्दी करण्यात येणार असून, आशाताई आणि यंत्रणेतील तालुका स्तरावरील संबंधित घटकांसाठी कार्यशाळा घेण्यात आल्या असून, प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती मित्राचे संचालक अभिजीत राऊत यांनी दिली.