आजपर्यंत निवडणुका लढवल्या असत्या तर मीही त्यांचा प्रचार केला असता – शहाजीबापू पाटील
शहाजीबापू पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ

पंढरपूर (प्रतिनिधी)
स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्याविरोधात ७ वेळा निवडणूक लढवली. प्रत्येक निवडणुकीत अपयश आले. प्रपंचाचे अतोनात नुकसान झाले.
जनतेच्या प्रपंचासाठी स्वतःच्या प्रपंचाची कधीही काळजी केली नाही. आता मात्र उमेदवारीसाठी चढाओढ लागली आहे. या अगोदर निवडणुका लढवल्या असत्या तर, मीही त्यांच्या प्रचारात उतरलो असतो, अशी कोपरखळी आ. शहाजीबापू पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार दीपकआबा साळुंखे पाटील यांना लगावली.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारास सुरुवात झाली आहे. सांगोला विधानसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ, सांगोला तालुक्यातील बलवडी येथील सिद्धनाथांचे दर्शन घेऊन श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी बलवडी येथील ग्रामस्थांनी त्यांचे मोठे स्वागत केले.
यावेळी बोलताना शहाजीबापू पाटील यांनी सांगितले की, १९९० सालात निवडणुकीच्या रिंगणात उतरलो. स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या विरोधात सात निवडणुका लढवल्या. प्रत्येक वेळी पराभूत झालो. आता मात्र उमेदवारीसाठी चढाओढ लागली आहे. यापूर्वी निवडणुका लढवल्या असत्या तर , मीही त्यांच्या प्रचारात उतरलो असतो ,अशी टीका त्यांनी दीपकआबा साळुंखे यांचे नाव न घेता केली. मी माझ्या आमदारकीच्या काळात पाच हजार कोटीहून अधिक निधी सांगोला तालुक्यात आणला आहे.
विरोधक यावर टीका करीत आहेत. मी प्रसिद्ध केलेले पुस्तक पाहून , मगच टीका करावी, असे आवाहन त्यांनी विरोधकांना केले. सांगोला तालुक्यातील पाणी प्रश्न मार्गी लावला आहे. आता सांगोला तालुक्यात एमआयडीसी पूर्ण करण्याचे स्वप्न मागे राहिले आहे. हे पूर्ण करण्यासाठी जनतेने आपल्याला साथ द्यावी, असे आवाहन यावेळी त्यांनी नागरिकांना केले.
महायुती सरकारने राबवलेल्या योजनांचा पाढा त्यांनी वाचला. माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा १५०० रुपये मिळत असून, महिलांचे जीवनमान उंचावण्याचे काम होत आहे. येणाऱ्या निवडणुकीत नागरिकांनी धनुष्यबाणासमोरील बटन दाबून आपल्याला मतदानरुपी आशीर्वाद द्यावा, अशी विनंती त्यांनी केली.