शरद पवारांनाही फसवलं, जनताच तुम्हाला अद्दल घडवणार -धैर्यशील मोहिते पाटील
अनिल सावंत यांच्या प्रचाराचा शुभारंभ

पंढरपूर (प्रतिनिधी)
राष्ट्रवादीप्रमुख शरद पवार यांच्यासारख्या बुजुर्ग
नेत्यास तुम्ही फसवलं, पंढरपूर मंगळवेढ्यातील जनता आता तुम्हाला अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका खा. धैर्यशील मोहिते पाटील यांनी भगीरथ भालके यांच्यावर केली. मंगळवेढा तालुक्यातील माचनूर येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसचे उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी उमेदवार अनिल सावंत यांच्यासह माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, ज्येष्ठ नेते राहुल शहा, प्रथमेश पाटील, रविकांत पाटील, दत्तात्रय भोसले, रवींद्र पाटील, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहराध्यक्ष रवी मुळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष भोसले, जिल्हा संघटक सुधीर भोसले, ओबीसी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष साधनाताई राऊत, अण्णा शिरसाट, काँग्रेसचे फिरोज मुलानी, संतोष रणदिवे, श्याम गोगाव यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना खा. धैर्यशील मोहिते पाटील यांनी, महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा घोळ सांगण्याचा प्रयत्न केला. ऐनवेळी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून जाहीर झालेल्या भगीरथ भालके यांच्यावर कडाडून टीका केली. २७ तारखेला काय झाले ठाऊक नाही, २८ तारखेला तुम्ही फिरकलाच नाही. राष्ट्रवादीप्रमुख शरद पवार यांच्यासारख्या बुजुर्ग नेत्याला तुम्ही फसवलं. पंढरपूर मंगळवेढ्याची जनता हुशार आहे. शरद पवार यांच्यावर प्रेम करणारी आहे. २००९ साली आमच्या कुटुंबाने अनुभवले आहे. यामुळे ही जनता तुम्हास अद्दल घडविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास यांनी त्यावेळी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची उमेदवारी
अनिल सावंत यांच्या संयम आणि शिस्तीला दिलेली देणगी आहे. पंढरपूर विधानसभा मतदारसंघात त्यांचा विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली.