
पंढरपूर (प्रतिनिधी)
विठ्ठल परिवाराच्या स्थापनेपासून आजपर्यंत मी विठ्ठल परिवारातच आहे. कै. आ. भारत नाना भालके यांच्या विचारांचा पाईक आहे. यामुळेच भालके यांच्या विचाराशी सहमत असणारे अनेक सामान्य नागरिक
माझ्या जवळ आहेत. मी कधीही समविचारी आघाडी केली नाही. विचारांशी फारकत घेतली नाही, अशा शब्दात मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी भगीरथ भालके, यांनी त्यांच्यावर केलेल्या आगपाखडीला समर्पक उत्तर दिले.
विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीपासून विठ्ठल परिवाराची अवस्था पाहण्यालायक झाली आहे. विठ्ठल परिवारातील चारही नेत्यांची राजकारणात घसरगुंडी झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर त्यांनी चारही विधानसभा मतदारसंघात आपली ताकद असल्याचे दाखवण्यास सुरुवात केली आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक त्यांनी सोमवारी दाते मंगल कार्यालयात घेतली होती.
यावेळी मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांच्यावर भगीरथ भालके यांनी कडाडून टीका केली होती. या टीकेस मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी मोजक्या आणि शेलक्या शब्दात प्रत्युत्तर दिले आहे. ते पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
विठ्ठल परिवाराची स्थापना १९९५ साली कै. वसंतदादा काळे यांनी केली. यावेळी त्यांची आणि राज ठाकरे यांची भेट आपणच घडवून आणली होती. या भेटीनेच तालुक्यात चंद्रभागा साखर कारखान्याची निर्मिती झाली. तेव्हापासून आजतागायत मी विठ्ठल परिवारातच आहे. विठ्ठल कारखान्याचे चेअरमन झाल्यापासून भगीरथ भालके हे विठ्ठल परिवाराचे नेते झाले. ते आजही परिवाराचे नेते आहेत. आजवर प्रत्येक कार्यक्रमात कै. आ. भारत भालके यांची प्रतिमा मी वापरली. त्यांच्या विचारांचा मी पाईक आहे. त्यांच्या विचारांशी कधीही फारकत घेतली नाही.
कोणासोबतही कधीही समविचारी आघाडी स्थापन केली नाही.भगीरथ भालके यांना अचानक काय झाले आहे ? हेच समजत नाही. आजपर्यंत अनेक वर्षे मी भारत भालके यांचा फोटो वापरत होतो. तेव्हा त्यांना अडचण नव्हती. आणि आता का व्हावी ? असा प्रति प्रश्न त्यांनी केला.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील पहिली उमेदवारी माझ्या खांद्यावर दिली. वास्तविक पाहता विठ्ठल परिवार म्हणून प्रत्येकाला आनंद वाटणे स्वाभाविक होते. परंतु तसे होताना दिसत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. विठ्ठल परिवाराचा पाईक म्हणून आज माझ्यासोबत नागरिकांची फौज आहे. त्यांच्या बळावर आणि कै.आ. भारत भालके यांच्या
विचारांचा वारसदार म्हणून मी निवडणुकीस सामोरे जाणार आहे , अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी व्यक्त केली.
विठ्ठल परिवारात असूनही भगीरथ भालके यांनी समविचारी आघाडी स्थापन केली. आपण कधीही विरोधकांशी तडजोड केली नाही.आ. समाधान अवताडे यांना सिद्धेवाडी पासून पंढरपूरकडे कोण येऊ देत नव्हते ? हा प्रश्न भगीरथ भालके यांनी
सभेतून विचारावा, असे आवाहनही त्यांनी केले.