
पंढरपूर (प्रतिनिधी)
स्त्री ही नवनिर्मितीची देवता आहे. धरणी माता ज्याप्रमाणे माणूस जातीचे पालन पोषण करते, त्याचप्रमाणे स्त्री देखील नवनिर्मिती करते. धरणी माता अन्नधान्य देऊन माणूस जातीचे पालन पोषण करते, त्याचप्रमाणे या जगात विविध घटकांची निर्मिती करण्याचे काम स्त्री करते. ती नवनिर्मितीची ज्वलंत मूर्ती आहे. तिच्या नवनिर्मितीतून अनेक शूरवीर, संशोधक, विद्वान निर्माण होतात, या स्त्रीशक्तीला प्रत्येक मानव जातीने वंदन करायला हवं, तिचं रक्षण करायला हवं, असे मत उद्योजक अनिल सावंत यांनी पंढरपूर येथील दांडिया २०२४ च्या उद्घाटन समारंभात व्यक्त केले. या महोत्सवास दि.१० सप्टेंबर रोजी येथील तनपुरे मठात सुरुवात झाली.
या महोत्सवाच्या माध्यमातून स्त्रीच्या विविध
कला कौशल्याला वाव देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, चार भिंतीमध्ये कायमस्वरूपी आपल्या स्वतःला बंदिस्त करून घेणाऱ्या या स्त्रीला नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने दांडियाच्या माध्यमातून एक प्रकारे व्यक्त होण्याची संधी देण्यात आली आहे. असेही यावेळी अनिल सावंत यांनी सांगितले.
दांडिया उत्सव कार्यक्रमात विजेत्या संघाला १८ विविध बक्षिसे देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमास एनआयआयटी चे अध्यक्ष श्याम गोगाव सर, संभाजी ब्रिगेडचे स्वागत कदम, माजी नगरसेवक श्रीनिवास बोरगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.