
पंढरपूर:
सध्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर आहे. या निवडणुकीने भल्या भल्या राजकारण्यांना गुढग्यावर आणले आहे. २५ वर्षे आमदारकी भोगलेले आ.बबनदादा शिंदे यांची सद्याची मनस्थिती पाहता,सध्याच्या राजकीय परस्थितीचा अंदाज आल्याशिवाय राहत नाही.
माढा मतदारसंघावर आ.बबनदादा शिंदे यांनी
आजवर अधिराज्यच केले आहे. या मतदारसंघात ते अजातशत्रू म्हणून प्रसिद्ध झाले ,ते त्यांच्या राजकीय कौशल्यामुळे. मग या निवडणुकीला सामोरे जाताना त्यांची वणवण का सुरू आहे ? असा प्रश्न त्यांचे राजकीय विरोधक अभिजीत पाटील यांनी केला आहे ? यावरून आ. बबन दादा शिंदे यांच्याबाबत मतदारसंघात उलटसुलट चर्चा होऊ लागल्या आहेत.
या विधानसभा निवडणुकीत आ.बबनदादा शिंदे स्वतः न उतरता, पुत्र रणजित सिंह शिंदे यांना निवडणूक रिंगणात उतरवणार आहेत. यातच राजकारणात शरद पवार यांच्या तुतारीचे वारे जोराने वाहू लागले आहे. विठ्ठल सह. साखर कारखान्याचे चेअऱमन अभिजीत पाटील हे माढ्याच्या मैदानात उतरले आहेत. त्यांची साखर कारखानदारीतील झेप जनतेन डोक्यावर घेतलीय. त्यांनी ऊसदराबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे हित साधले आहे. त्यांच्या समोर नाइलाजाने बबन दादा शिंदे यांना एक रुपया जास्त देणार म्हणावे लागले होते. यातच अभिजीत पाटील हे राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांच्या अगदी निकट आहेत. ज्या अजित पवार राष्ट्रवादीत सध्या बबन दादा शिंदे आहेत, त्या पक्षाविषयी नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. यामुळेच या पक्षाला राम राम ठोकून आ. बबन दादा शरद पवार यांच्या भोवती पिंगा घालत असल्याचे दिसत आहेत.
खमका राजकीय विरोधक. लोकांमध्ये त्याची असलेली क्रेझ. त्याच्याविरोधात आपला मुलगा अगदीच साधा सरळ. त्यांचे असलेले शरद पवार यांच्याबरोबरचे संबंध. राज्यात शरद पवार यांच्या तुतारीची असलेली क्रेझ. याउलट बबन दादा यांनी शरद पवार यांच्या पक्षातून मागील काळात केलेले सत्तांतर यास भरीस भर म्हणून मराठा आंदोलकांची बबन दादा शिंदे यांच्यावर असलेली खप्पा मर्जी यामुळे वर्षानुवर्षे आमदारकी भोगून बसलेले बबनदादा पुरते धास्तवल्याचे दिसत आहेत. यामुळेच लोकप्रिय असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाभोवती त्यांचे उभे रिंगण सुरू आहे.