
पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर तालुका न्यायालयाच्या आवारात लवकरच लॉयर्स हॉल साकारणार असून , यासाठी मोठ्या निधीच्या तरतुदीस शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच या हॉलचे बांधकाम सुरू होईल , अशी माहिती पंढरपूर मंगळवेढ्याचे आ. अवताडे यांच्याकडून देण्यात आली आहे.
पंढरपूर आणि मंगळवेढा येथील विधीज्ञ मंडळींनी अधिवक्ता संघाच्या वतीने लॉयर्स हॉल उभारण्याची मागणी आ. अवताडे यांच्याकडे केली होती.या मागणीचा रेटा आ. अवताडे यांनी शासन दरबारी लावला होता. आ. अवताडे यांच्या पाठपुराव्यास अखेर यश आले असून , या हॉलसाठी शासनाकडून निधीची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पंढरपूर आणि मंगळवेढा न्यायालयाच्या आवारात लॉयर्स हॉल बांधण्याचा प्रस्ताव , मुंबई उच्च न्यायालयाकडून शासनास सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी , आ. अवताडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या लॉयर्स हॉलच्या बांधकामास निधीची तरतूद झाल्यामुळे , वकील मंडळी आणि सामान्य नागरिकांचा मोठा फायदा होणार आहे. यामुळे वकील मंडळी आणि येथील नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
दोन हॉलसाठी २ कोटी ७० लाख
पंढरपूर तालुका न्यायालयाच्या आवारात एक वकील हॉल , आणि मंगळवेढा तालुका न्यायालयाच्या आवारात दुसरा वकील हॉल , असे दोन हॉल उभारण्यात येणार आहेत. पंढरपूर लॉयर्स हॉलसाठी १ कोटी ३४ लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. तर मंगळवेढा वकील हॉलसाठी १ कोटी ३६ लाख रुपये देण्यात येणार आहेत.