
पंढरपूर (प्रतिनिधी)
तीर्थक्षेत्र पंढरी नगरीत भाविकांची कायम वर्दळ असते. भाविकांची वाहनेही मोठ्या प्रमाणात येतात. यातच अवजड वाहनांनी शहरात प्रवेश केल्यामुळे मोठा अडथळा निर्माण होतो. परिणामी रस्ते जाम होतात. याचा त्रास पंढरीत आलेल्या भाविकांना होतो. यामुळे ही अवजड वाहने शहरा बाहेरून पाठवावीत , आणि शहरात चौका चौकात सिग्नल व्यवस्था सुरू करावी , अशी मागणी पंढरपूर शहर काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
पंढरपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष अमर सूर्यवंशी यांनी याबाबतचे निवेदन पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना देण्यात आले आहे. हेच निवेदन पंढरपूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनाही पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी दखल न घेतल्यास , तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही , पंढरपूर शहर काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.
सकाळी व दुपारी पंढरपूर शहरात अचानक अवजड वाहने प्रवेश करतात. यामुळे येथील नागरिकांना मोठा त्रास होतो. शहराबाहेरून बायपास रोड अस्तित्वात आहे. याशिवाय रिंग रोडही सुरू झाला आहे. यामुळे या वाहनांना शहराबाहेरून पाठवण्यासाठी दिशादर्शक फलक जागोजागी लावणे गरजेचे आहे. पंढरपूर शहरात रस्ते जाम होऊ नयेत यासाठी , महत्त्वाच्या चौकांमध्ये सिग्नल बसवणे गरजेचे आहे. ही सिग्नल व्यवस्था सुरू केल्यास , रस्ते जाम होणार नाहीत, यामुळे सिग्नल व्यवस्था तात्काळ सुरू करण्याची मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
याप्रसंगी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष संदीप शिंदे, सेवादल शहराध्यक्ष गणेश माने, जिल्हा सरचिटणीस पांडुरंग डांगे, सोशल मीडियाचे शहराध्यक्ष महेश अधटराव, शहर उपाध्यक्ष नागनाथ अधटराव, मिलिंद अढवळकर, भीमाशंकर इंगोले, संग्राम मुळे, चिटणीस सुहास गायकवाड, एकनाथ माने, सुदीप पवार यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.