
पंढरपूर (प्रतिनिधी)
समाजात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केला जातो. पालक हा कार्यक्रम मनभरून पाहतात. परंतु
मुलाच्या शाळेत त्याच्या वडिलांचा सन्मान ही गोष्ट मोठी दुर्मिळच असते. पंढरीतील समाजसेवक
मुजमील कमलीवाले यांना येथील आदर्श प्राथमिक मंदिर शाळेमध्ये सन्मानित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या शाळेत त्यांचा पाल्य शिकत आहे.
मुजमिल कमलीवाले हे पंढरीतील प्रसिद्ध व्यक्तिमत्व. अनेक शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून आजपर्यंत मेडिकल साहित्य पुरवण्यात आले. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कर्मचारी, पोलीस बांधव, तसेच आदर्श शिक्षकांचा त्यांनी नेहमीच सन्मान केला आहे. अशा या समाजसेवकास आजपर्यंत ५० हून जास्त पुरस्कार मिळाले आहेत. यामुळेच त्यांचा सन्मान आदर्श प्राथमिक मंदिर शाळेच्या व्यवस्थापनाकडून करण्यात आला. शाल, हार आणि श्रीफळ देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. आजपर्यंत केलेल्या कामाची ही पोहोचपावती असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी शबनम कमलीवाले, शाळेच्या मुख्याध्यापिका माया सांगोलकर, रजनी देशपांडे, आशा पाटील यांचेसह सर्व शिक्षक वर्ग आणि असंख्य पालक उपस्थित होते.