यावेळी मी कुठेही कमी पडणार नाही – भगीरथ भालके
भगीरथ भालके यांच्या प्रचाराचा माचणुर येथून शुभारंभ

पंढरपूर (प्रतिनिधी)
मागील पोटनिवडणुकीत माझ्या हातून काही चुका झाल्या असतील,पण ही निवडणूक मी आरपारची लढाई समजून लढणार आहे. या निवडणुकीत कोणतीही चूक माझ्या हातून होणार नाही.असा विश्वास काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांनी खा.प्रणितीताई शिंदे आणि उपस्थित नागरिकांना दिला. मंगळवेढा तालुक्यातील माचनूर येथील सिद्धेश्वर मंदिरात खा. प्रणितीताई शिंदे शुभहस्ते नारळ फोडून भगीरथ भालके यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
बुधवारी पार पडलेल्या या कार्यक्रमास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप माने, चेतन नरोटे, अर्जुन पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. याच ठिकाणी भगीरथ भालके यांच्या प्रचाराचा शुभारंभ भव्य सभेतून करण्यात आला. यावेळी बोलताना भगीरथ भालके यांनी, विरोधकांवर कडाडून टीका केली. स्वर्गीय आ. भारतनाना भालके यांनी ४२ गावचा पाणीप्रश्न त्याचवेळी मार्गी लावण्याचा प्रयत्न केला होता. परंतु २४ गावचा पाणीप्रश्न आणि पंढरपूर एमआयडीसीचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले.या कार्यक्रमातून आ. समाधान अवताडे यांनी जनतेची दिशाभूल केली असल्याचा आरोप त्यांनी केला.
राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांचे कान कोणीतरी भरले, आणि पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार याच मतदारसंघात जाहीर केला. येत्या दोन तीन दिवसात खा. प्रणिती शिंदे यांनी याबाबत निर्णय घ्यावा, आपली उमेदवारी महाविकास आघाडीची उमेदवारी म्हणून जाहीर करावी.मित्र पक्षातील दुसरा उमेदवार आपल्यावर तोंडसुख घेत आहे, त्यालाही समजावून सांगावे, अन्यथा अंगावर आलेल्या शिंगावर घेण्याची शिकवण मला माझ्या बापाकडून मिळाली आहे, असेही त्यांनी यावेळी ठणकावले.
यावेळी बोलताना खा. प्रणिती शिंदे यांनी भाजपावर कडाडून टीका केली. भाजपच्या माझी लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना त्यांनी, आम्ही जिजाऊ, अहिल्या आणि रमाईच्या लेकी आहोत, तुटपुंज्या मदतीला भिक घालणार नाही असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी दिलीप माने, चेतन नरोटे, गणेश पाटील, किरण घाडगे, प्रणितीताई भालके भगीरथ भालके यांच्या मातोश्री यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी चार ते पाच हजार नागरिकांचा समुदाय उपस्थित होता.