
पंढरपूर (प्रतिनिधी)
मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजू खरे यांचा जोर वरचेवर वाढतच चालला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांच्यापाठोपाठ, भीमा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान व्हा. चेअरमन यांचेसह इतर संचालकांनी राष्ट्रवादी उमेदवार राजू खरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
भीमा सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन सतीश जगताप यांनी त्यांच्या समर्थक संचालकांसह, राष्ट्रवादीचे उमेदवार राजू खरे यांना
सोमवारी पाठिंबा जाहीर केला. सोमवारी सकाळी
सतीश जगताप यांच्या सोहाळे येथील निवासस्थानी झालेल्या बैठकीत, हा निर्णय जाहीर करण्यात आला. या बैठकीने भीमा कार्यक्षेत्रात
मोठी खळबळ उडाली आहे. भाजपाचे कोल्हापूर येथील खासदार धनंजय महाडिक हे भीमा कारखान्याचे चेअरमन असून, सतीश जगताप हे त्यांच्याच नेतृत्वाखाली काम करत आहेत. लोकसभा निवडणुकीतही त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार खा. प्रणिती शिंदे यांना पाठिंबा जाहीर करून, त्यांच्या प्रचार कार्यातही उतरले होते. आता विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीसोबत राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून, त्यांच्या या पाठिंब्यामुळे
भीमा परिसरात महाविकास आघाडीचे उमेदवार राजू खरे यांचा जोर आणखी वाढला आहे.
विधानसभा निवडणुकीचे वारे वरचेवर तापू लागले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राजू खरे यांचा जोरही वरचेवर वाढतच चालला आहे. मागील दोन दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनी, महायुतीला सोडत उमेदवार राजू खरे यांना पाठिंबा जाहीर केला होता. मोहोळ विधानसभा मतदारसंघात
राजू खरे हे धक्क्यावर धक्के देत चालले असून, त्यांची विजयाच्या दिशेने ही कूच असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे.
सोमवारी सोहाळे येथे हा पाठींबा देण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे, मोहोळ मतदार संघाचे अध्यक्ष श्रीकांत गायकवाड, मोहोळ तालुकाध्यक्ष विनय पाटील, भीमाचे संचालक अनिल कदम, शेतकरी संघटनेचे छगन पवार, आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील पदाधिकारी यांचेसह, भीमा सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील सरपंच, सोसायटीचे चेअरमन, आदींसह, विविध संघटनेचे आणि संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.