आ. अभिजीत पाटील यांनी दिली पंढरपूरकरांच्या आशेला विमानतळाची किनार
पंढरपूरसाठी विमानतळाची मागणी

पंढरपूर (प्रतिनिधी)
तीर्थक्षेत्र पंढरपूर नगरीत
विमानतळ करण्याची मागणी
माढा मतदारसंघाचे आ. अभिजीत पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे. माढा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील ४२ गावांचा समावेश असल्याने अभिजीत पाटील हे दोन्ही तालुक्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत.
केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची मुंबई येथे नुकतीच त्यांनी भेट घेतली. यावेळी पंढरपूर येथे केंद्रीय कृषी उड्डाण योजनेअंतर्गत पंढरपूर शहरात विमानतळ करण्याची मागणी त्यांनी केली. या संदर्भातील निवेदनही त्यांना सुपूर्द केले.
आ. अभिजीत पाटील हे मुळातच गतिमान नेतृत्व आहे. नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात त्यांनी माढा आणि पंढरपूर मतदार संघातील सुमारे
५५ प्रश्न मांडून , आमदारकीच्या पहिल्याच खेपेत सभागृहातील सदस्यांना आश्चर्यचकित केले.
उजनी धरण क्षेत्राला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याच्या त्यांच्या मागणीने , माढा तालुक्याच्या आशा उंचावल्या. यातच तीर्थक्षेत्र पंढरी नगरीत विमानतळ साकारण्याच्या त्यांच्या सूचनेने
पंढरपूरकरांच्या आशाही उंचावल्या आहेत.
पंढरपूर तीर्थक्षेत्र हे भगवान श्री विठ्ठलामुळे राज्यासह राज्याबाहेर आणि परदेशातही प्रसिद्ध आहे. या ठिकाणी भरणाऱ्या चैत्री, आषाढी, कार्तिकी आणि माघ यात्रेमुळे लाखो भाविकांची पंढरीत वर्दळ असते. आता तर आषाढी यात्रेदरम्यान पंढरी नगरीत परदेशी पाहुणेही दिसू लागले आहेत. पंढरी नगरीत विमानतळ झाल्यास , परदेशी भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होणार आहे. याशिवाय तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर या ठिकाणी येणाऱ्या भाविकांचा प्रवासही गतिमान होणार आहे. येथील शेतकऱ्यांना कमी वेळेत आणि कमी खर्चात
परदेशी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही मोठी वाढ होणार आहे. शेतकऱ्याच्या उत्पादनाला जगभरात नवी ओळख मिळणार आहे. केंद्रीय कृषी उड्डाण योजना २.० अंतर्गत पंढरीत विमानतळ होणे गरजेचे आहे, अशी मागणी आ. अभिजीत पाटील यांनी केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना भेटून केली आहे.
माढ्यातील नागरिकांनंतर पंढरपूरकरांच्याही उंचावल्या
माढा मतदारसंघातील उजनी धरण क्षेत्रास पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचे काम राज्य सरकारने जलद गतीने करावे ,अशी मागणी विधानभवनात आ. अभिजीत पाटील यांनी केली होती. यामुळे माढ्यातील नागरिकांच्या आशा उंचावल्या होत्या. आता पंढरी नगरीत विमानतळ करण्याची मागणी करून ,आ. पाटील यांनी
पंढरपूरकरांच्याही आशा उंचावल्या आहेत.