विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पाच दिवसांसाठी निलंबित
विरोधकांची जोरदार घोषणाबाजी

मुंबई :
राज्याच्या विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं सभागृहात सोमवारी झालेल्या प्रकरणात, निलंबन करण्यात आलं आहे. अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आल्याची घोषणा नीलम गोऱ्हे यांनी केली. यानंतर सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाले. नीलम गोऱ्हे यांनी विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलण्यास परवानगी दिली असता, देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले आणि त्यांनी आक्षेप घेतला. यानंतर विरोधकांना संधी न देता, पुढील कामकाज सुरु करण्यात आलं.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या वक्तव्यावरुन महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत राडा झाला. अंबादास दानवेंनी आपल्याकडे हात करणाऱ्या आ.प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली. त्यानंतर मंगळवारी भाजप आ. प्रसाद लाड यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. अंबादास दानवेंनी माफी मागावी, आणि त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली. तर चंद्रकांत पाटील यांनी दानवेंच्या निलंबनाची मागणी केली.चंद्रकांत पाटील म्हणाले, अंबादास दानवे यांनी प्रसाद लाड यांच्याकडे पाहत अर्वाच्य भाषा वापरली आहे. त्यांच्या बेशिस्त वर्तनाबाबत त्यांचं पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात यावे.