
पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर तालुक्यातील आढीव या गावात डॉ शितल शहा यांचे फार्महाऊस, तपोवन येथे पंचकल्याणक महामहोत्सवाचे भव्य आयोजन शनिवार दि. १ फेब्रुवारी ते बुधवार दि.५ फेब्रुवारी या कालावधीत कऱण्यात आले आहे, अशी माहिती आयोजक सुप्रसिध्द बालरोग तज्ज्ञ डॉ शितल शहा यांनी दिली.
आढीव येथील या तपोवनात श्री १००८,भ. मुनी सुव्रतनाथ यांचे शिखरासह मंदिर उभारण्यात आले आहे. यानिमित्ताने या ठिकाणी पंचकल्याणक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
विश्वशांती , आत्मशांती, विश्वकल्याण, आत्मकल्याण आणि पुण्यसंपादन या जैन समाजातील कल्याणकारी तत्त्वांचा जागर या महोत्सवात होणार आहे.
या कार्यक्रमात मुनींचे प्रवचन, स्वाध्याय, पुजा व सांस्कृतिक व विविध गुण दर्शनाचे कार्यक्रम
याप्रसंगी होणार आहेत. बांधकामात कोणत्याही प्रकारच्या लोखंडी व लाकडी वस्तूचा वापर न करता, केवळ राजस्थानी मकराना मार्बलमध्ये अजोड कलाकृतीने आकर्षक अशा या मंदिराची निर्मिती केली असल्याची माहिती, पंढरपूर येथील डॉ.शीतल शहा यांनी दिली आहे. ४० बाय ८० लांबी रुंदीच्या या मंदिराचे बांधकाम नऊ महिन्यांत झाले आहे. मंदिरासाठी लागणारा मार्बल पाषाण मखराना शहरातून आणून ,तेथेच राजस्थानी कारागिरांमार्फत कोरीव काम करून सुबक कलाकृतीने मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. या मंदिरामध्ये भगवान श्री १००८ मुनिसुव्रतनाथ तीर्थकारांची स्थापना करण्यात येणार आहे.१ फेब्रुवारी ते ५ फेब्रुवारी अखेर या मंदिरात पंचकल्याणक प्रतिष्ठेचे आयोजन करण्यात आले आहे.
जैन धर्म शास्त्रानुसार जैन गुरूंच्या सानिध्यातच व मंत्रोच्चाराद्वारे स्थापना करावी, अशी परंपरा असल्याने पंचकल्याण प्रतिष्ठा करण्यात येणार आहे.पंचकल्याण प्रतिष्ठेसाठी संपूर्ण भारतातून व महाराष्ट्रातून जवळपास सहा ते सात हजार श्रावक, श्राविका उपस्थित राहणार असल्याचे डॉ.शीतल शहा व त्यांच्या पत्नी सुषमा शहा यांनी सांगितले.
जैन धर्मगुरू आचार्य शिरोमणी व अध्यात्मक योगी १०८ विशुद्ध सागर महाराज, ससंघ ३० महाराज व आर्यिका येत आहेत.तसेच आचार्य सुयोग सागर महाराज ससंघ या पंचकल्याणकासाठी उपस्थित राहणार आहेत, असेही डॉ शितल शहा यांनी सांगितले.