
पंढरपूर (प्रतिनिधी)
तीर्थक्षेत्र पंढरपूर नगरीत महिलांसाठी १०० खाटांचे
स्वतंत्र रुग्णालय होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, मनसे नेते दिलीप धोत्रे आणि राज्याचे आरोग्य मंत्री सावंत यांच्या भेटीत यावर सकारात्मक चर्चा झाली आहे. मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्याकडून ही मागणी आरोग्यमंत्री सावंत यांच्याकडे करण्यात आली होती. याबाबतचे निवेदन त्यांना देण्यात आले असून, या रुग्णालयाबाबत सकारात्मक चर्चाही झाली आहे. याबाबतचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सूचना,आरोग्य मंत्री सावंत यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
पंढरपूर शहराची आणि पंढरपूर शहरात येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता, पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय इलाजासाठी तोकडे पडते. या रुग्णालयावर प्रचंड ताण येतो, परिणामी येथील नागरिकांना खाजगी दवाखान्याचे दरवाजे ठोठावावे लागतात, यासाठी त्यांना आर्थिक त्रास सहन करावा लागतो. यासाठी पंढरपुरात महिलांसाठी १०० खाटांचे स्वतंत्र रुग्णालय व्हावे, अशी मागणी मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी आरोग्यमंत्र्यांकडे केली होती. यास ना. सावंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, पंढरपुरात महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.