कोडं सुटतंय ! विठ्ठल कारखान्याचा कर्जासाठी एनसीडीसीकडे प्रस्ताव

पंढरपूर (प्रतिनिधी)
मागील पाच वर्षापासून आर्थिक गर्तेत सापडलेल्या
विठ्ठल कारखान्याला उर्जितावस्था येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची थकाबाकी असणाऱ्या या कारखान्याने आता कर्जासाठी एनसीडीसीकडे प्रस्ताव दाखल केल्याची माहिती मिळत आहे. हे कर्ज मिळाल्यास विठ्ठल साखर कारखाना पूर्वपदावर येणार आहे.
मागील काही दिवसापूर्वीच पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखाना काही वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने ४३० कोटी रुपयांचे थकीत कर्ज असल्यामुळे, या कारखान्यावर जप्तीची कारवाई केली होती. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या कारवाईचा फटका बसायचा त्याला बसला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी मध्यस्थी करून लोकसभा निवडणुकीत भाजपाला सहकार्य करावे , असा सल्ला अभिजीत पाटील यांना दिला. आणि अभिजीत पाटील रात्रीतच महाविकास आघाडीतून महायुतीकडे गेल्याचे पहावयास मिळाले.
आता लोकसभा निवडणुकीचा धुरळा शांत झाला आहे. विधानसभा निवडणुकीचे बिगुल थोड्याच दिवसात वाजणार आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे शल्य राज्यातील भाजपा नेत्यांना आहे. यातच पुढील विधानसभा निवडणुकीत तरी अभिजीत पाटील यांची मदत आपणास व्हावी, याकरिता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावले उचलायला सुरू केली आहेत. याच पार्श्वभूमीवर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने कर्जासाठी एनसीडीसीकडे प्रस्ताव दाखल केला आहे. याबाबतची चर्चा नागरिकांमधून ऐकावयास मिळत आहे.
चौकट
एनसीडीसी म्हणजे राष्ट्रीय साखर विकास निधी. या
संस्थेकडून विठ्ठल कारखान्यास कर्ज मिळाल्यास, विठ्ठल कारखान्याला आर्थिक स्थैर्य प्राप्त होणार आहे.
यामुळे सभासद वर्गात आनंदाचे वातावरण आहे.