
पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरीच्या विठुरायाच्या आषाढी सोहळ्यासाठी येणाऱ्या प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी वारकऱ्यांना खुश करण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा भाविकांमधून होत आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. राज्यातील ४८ पैकी फक्त १७ जागांवर त्यांना यश मिळाले आहे. मुंबई येथे सह्याद्री अतिथी गृहावर आषाढी यात्रेसंदर्भात पार पडलेल्या बैठकीत याची चुणूक पहावयास मिळाली.
या बैठकीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंदिर समितीचे शहराध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, राणा महाराज वासकर, हभप विठ्ठल पाटील आदींसह प्रत्येक जिल्ह्यातील पालखी प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत विठ्ठल पाटील यांनी पायी चालत येणाऱ्या प्रत्येक दिंडीस ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात यावे, अशी मागणी केली होती. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक दिंडीस वीस हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले. सुमारे दीड हजार दिंड्यांना याचा फायदा होणार आहे. यामुळे वारकरी भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वारकरी भाविकांना खुश करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला असल्याची चर्चा भाविकांमधून होत आहे.
*अधिकाऱ्यांनी घेतला मुख्यमंत्र्यांचा धसका*