शक्तीपीठ महामार्ग उभारण्याची राज्य शासनाची तयारी
शेतकऱ्यांचा विरोध शमवण्यासाठी भारतीय किसान मोर्चा मैदानात

पंढरपूर (प्रतिनिधी)
समृद्धी महामार्गा प्रमाणेच
राज्यात नागपूर गोवा
हा शक्तिपीठ महामार्ग
उभारण्याचा राज्य सरकारचा मानस आहे.
विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातून जाणाऱ्या या महामार्गास
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून विरोध होत आहे. यातच लोकसभा निवडणुकीची धूळ जमिनीवर बसते न बसते तोच,राज्य सरकारने या महामार्गासाठी भूसंपादन
करण्याचे जाहीर केले आहे. या महामार्गाला होणारा शेतकऱ्यांचा विरोध पाहता, भारतीय किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचा विरोध शमावण्याचे काम सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून पंढरपूरमध्ये
भारतीय किसान मोर्चाची पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये कोणत्याही शेतकऱ्याला भूमिहीन होऊ देणार नाही, त्याला पर्यायी जमीन मिळवून देऊ, शेतकऱ्यांची बाजू राज्य सरकारकडे भक्कमपणे मांडू, अशी भूमिका या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
नागपूर ते गोवा हा शक्तिपीठ महामार्ग ७६० किमी. लांबीचा असून, याच्या उभारणीसाठी ८५ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा महामार्ग राज्यातील वर्धा, परभणी, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, सांगली कोल्हापूर जिल्ह्यातून जाणार आहे. या महामार्गासाठी मोठे भूसंपादन होणार असून,
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. याशिवाय रत्नागिरी नागपूर या महामार्गास हा महामार्ग समांतर आहे. अनेक तीर्थक्षेत्रांना जोडणार असल्यामुळे या महामार्गाला शक्तिपीठ नाव देण्यात आले आहे. असे असले तरी, ही शक्तीपीठे उपरस्त्यांनी रत्नागिरी नागपूर रस्त्यात जोडल्यास कोणतीही अडचण येणार नाही. यामुळेच रत्नागिरी नागपूर या महामार्गाला समांतर असणारा हा महामार्ग रद्द करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात १८ जून रोजी कोल्हापूर जिल्ह्यात महामोर्चाचे आयोजनही करण्यात आले आहे.
काही दिवसापूर्वीच राज्य सरकारने हा शक्तिपीठ महामार्ग बनवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या महामार्गासाठी भूसंपादन करण्याचे आदेश जारी केले आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीय किसान मोर्चाचे पदाधिकारी पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांची बाजू मांडू लागले आहेत. एकीकडे भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करून, दुसरीकडे शेतकऱ्यांना हाताळण्याचा प्रयत्न या शेतकरी संघटनेकडून होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होऊ लागला आहे.
पंढरपूरमध्ये भारतीय किसान मोर्चाची पत्रकार परिषद शनिवारी पार पडली. या पत्रकार परिषदेस भारतीय किसान मोर्चाचे प्रदेश पदाधिकारी संदीप गिड्डे यांनी आपली भूमिका व्यक्त केली. यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, पूर्व सोलापूरचे अध्यक्ष जगन्नाथ गायकवाड, प्रदेश सचिव सोपान नारनवर, यांच्यासह भाजपा किसन मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.