ईतरसामाजिक

पंढरपूर तालुक्यास वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका

सुमारे ११०१ हेक्टर शेती पिकांचे नुकसान

प्रतिनिधी/पंढरपूर
रविवार दि. २६ मे रोजी पंढरपूर तालुक्याला वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार झोडपले. पंढरपूर तालुक्यातील घरांसह हजारो हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाले. याच पावसात वीज पडून भटुंबरे येथील एक महिलाही मयत झाली तर शेतकऱ्यांची दोन मोठी जनावरेही दगावली आहेत.

रविवारी झालेल्या या पावसात, पंढरपूर तालुक्यात झालेल्या नुकसानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली असून, यामध्ये ११०१ हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. शेतीमधील केळी, द्राक्ष, यासह इतर नगदी पिकांना जोरदार फटका बसला आहे. पंढरपूर तालुक्यातील नुकसानग्रस्त केळीबागा अधिक असून,
केळी बागायतदारांना याचा मोठा फटका बसला आहे. पंढरपूर तालुक्यातील ९१ गावांना या पावसाचा फटका बसला असून, यामध्ये १५२२ शेतकरी बाधित झाले आहेत. ११०१ हेक्टर शेती पिके उध्वस्त झाली असून, यामध्ये विविध पिकांचा अंतर्भाव आहे. २८७ घरांची अंशतः पडझड झाली असून, १६८ घरे पूर्णतः जमीनदोस्त झाली आहेत. पंढरपूर शहराजवळील भटुंबरे येथील एक महिला वीज अंगावर कोसळून मृत्युमुखी पडली असून, शेतकऱ्यांची दोन मोठी जनावरेही या पावसामुळे दगावली असल्याचे प्रशासनाकडूनच सांगण्यात येत आहे.

रविवारी झालेल्या या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असले तरीही, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांमुळे पंढरपूर तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी पंढरपूर तालुक्यात एकूण ८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, सरासरी ८.८८ मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे. चळे महसूल मंडळात सर्वात जास्त पाऊस पडला असून, या ठिकाणी १८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या खालोखाल पटवर्धन कुरोली १५ मी.मी., करकंब १४ मिमी,पुळूज १३ मिमी, पंढरपूर
१२ मिमी ,तुंगत ६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close