
पंढरपूर(प्रतिनिधी)
पंढरपूर शहरातील कायमच रहदारी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात, तरुणावर कोयत्याने सपासप वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. पंढरपूर शहरातील दोन वाहतूक पोलिसांमुळे त्याचा जीव वाचला असल्याची घटना घडली आहे. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून त्यास येथील लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ठेवण्यात आले आहे.
सुभाष ज्योतीराम लिमकर ( वय ४८) असे जखमी व्यक्तीचे नाव असून, अमित लक्ष्मण वाठारकर असे या घटनेतील आरोपीचे नाव आहे. कोयत्याने वार करणाऱ्या वाठारकर या युवकास , पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पंढरपूर शहरातील डाळे गल्ली येथे लिमकर कुटुंब राहत आहे.
जखमी सुभाष लिमकर यांची पुतणी आणि आरोपी अमित वाठारकर याचे काही दिवसांपूर्वी प्रेमसंबंध होते. यावरून सुभाष लिमकर यांनी काही दिवसांपूर्वी अमित वाठारकर यास एक थप्पड मारली होती. तेव्हापासून तो सुभाष लिमकर यांच्यावर चिडून होता.
सुभाष लिमकर यांची लाकूड वखार आहे. नेहमीप्रमाणे ते सकाळी आठ वाजता मजूर आणण्यासाठी घराबाहेर पडले.ते चौफाळा येथे आले असता, अमित वाठारकर हा तेथे हातात कोयता घेऊन आला. त्याने कोयत्याने लिमकर यांच्यावर वार करण्यास सुरू केले. बघता बघता सुभाष लिमकर हे धारातीर्थी पडले. याचवेळी त्या ठिकाणी कर्तव्यावर असणारे वाहतूक पोलीस कर्मचारी खटकाळे आणि नदाफ यांनी सोडवा सोडव केली. या घटनेतील आरोपी अमित वाठारकर यास ताब्यात घेतले. याच वेळी जखमी
सुभाष लिमकर यांना येथील लाईफलाईन हॉस्पिटल मध्ये पोहोचवले. वाहतूक पोलीस कर्मचारी उपस्थित नसते तर , मोठा अनर्थ घडला असता , अशी प्रतिक्रिया उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन जाधव यांच्याकडून देण्यात आली आहे.
याप्रकरणी जखमीचा मुलगा आदित्य सुभाष लिमकर यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून , आरोपी अमित वाठारकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.