पत्रकारांनी सत्ताधारी घटकांच्या विरोधात ठाम भूमिका घेतली पाहिजे
अमरजीत पाटील यांनी केली भावना व्यक्त

पंढरपूर (प्रतिनिधी)
पत्रकारांनी प्रस्थापित राजकीय सत्तेच्या विरोधातच लिहिले पाहिजे. समाजातील उपेक्षित, वंचित घटकांचा आवाज होऊन पत्रकारिता केली पाहिजे. पत्रकार हा निर्भीड असला पाहिजे. त्याने प्रस्थापित घटकांच्या विरोधात सातत्याने आवाज उठविला पाहिजे. समाज जीवनात सत्ताधारी वर्ग हा वेगवेगळ्या माध्यमातून समाजातील सामान्य घटकांचे शोषण करत असतो. सत्तेच्या बळावर तो आर्थिक स्वरूपाचा भ्रष्टाचार करत असतो. तेंव्हा अशा भ्रष्टाचाराला विरोध करण्याचे कार्य त्याने निष्ठेने केले पाहिजे. तरच पत्रकार लोकशाही व्यवस्थित टिकवू शकतील.” असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य अमरजित पाटील यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात प्रसिद्धी विभाग, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्र व इंटायर मल्टीमिडिया अँड मास कम्युनिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी पत्रकार दिनानिमित्त आयोजित पत्रकार सन्मान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. भगवान नाईकनवरे, उपप्राचार्य डॉ. तुकाराम अनंतकवळस, उपप्राचार्य डॉ. राजेश कवडे, ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे, शिवाजी शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते.
अमरजित पाटील पुढे म्हणाले की, “समाज बदलण्याची ताकद केवळ युवक आणि पत्रकार यांच्यामध्येच असते. पत्रकारांनी समाजातील सर्व क्षेत्रातील प्रश्नांचा अभ्यास केला पाहिजे. समाजाचे प्रश्न वृत्तपत्रातून मांडले पाहिजेत. प्रसार माध्यमाचे बदललेले स्वरूप विचारात घेऊन आपली लेखणी गतिशील बनवली पाहिजे. समाजात अनेक पत्रकारांनी जीवावर धोका पत्करून पत्रकारिता केली आहे. विविध समस्या आणि प्रश्नांना भिडण्याची ताकद लेखणीत असते. मराठी पत्रकारितेला समाज सुधारणेचा वारसा लाभलेला आहे.
अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य डॉ. भगवान नाईकनवरे म्हणाले की, “पत्रकारांकडून समाजाला मोठी अपेक्षा असते. लोकशाही जिवंत ठेवून तिचे लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी ही पत्रकारांची असते. आर्थिक लाभाविषयीची लालसा दूर ठेवून प्रामाणिक पत्रकारिता समाजाचे प्रश्न सोडविण्यास सक्षम आहे.”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत प्रा. डॉ. दत्ता डांगे यांनी केले. तर प्रमुख मान्यवरांचा परिचय प्रा. डॉ. रविराज कांबळे यांनी करून दिला. या कार्यक्रमात पंढरपूर शहर आणि परिसरातील विविध वृत्तपत्रे, न्यूज चॅनेल, वृत्तवाहिन्या, न्यूज पोर्टलचे संपादक, पत्रकार, वार्ताहर सहभागी झाले होते. त्यांचा गुलाब पुष्प, पेन आणि डायरी देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सारिका भांगे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. दत्तात्रय खिलारे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. विनया पाटील, प्रा. धनंजय वाघदरे, प्रा. राजेंद्र मोरे, प्रा. नानासाहेब कदम, अमोल जगदाळे, अभिजित जाधव, अमोल मोरे, समाधान बोंगे आदींनी परिश्रम घेतले.