
पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूरकरांना धुळीच्या साम्राज्याने ग्रासले आहे. श्वसनाच्या त्रासासह इतर आजारांना पंढरपूरकर बळी पडू लागले आहेत. याप्रकरणी सोलापूर जिल्हा ओबीसी काँग्रेस आक्रमक झाली असून , २५ जानेवारीपर्यंत हा त्रास कमी करण्याची विनंती , पंढरपूर नगरपरिषद प्रशासनाला केली आहे. अन्यथा २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिनी उपोषणाचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.याप्रकरणी जिल्हा ओबीसी काँग्रेसकडून पंढरपूर नगरपरिषद प्रशासनास निवेदन देण्यात आले आहे.
पंढरपूर ही महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते. येथे दरवर्षी चार यात्रांकरता कोट्यावधी रुपयांचा निधी दिला जातो. नगरपरिषद प्रशासन सुद्धा विविध करांच्या माध्यमातून कर आकारणी अगदी सक्तीने करत असते. मात्र या करांच्या बदल्यात दररोज अर्धा किलोच्या वर धुळच खावी लागते. नगरपालिकेकडे अनेक वर्षापासून रोड स्लीपर्स अस्तित्वात आहेत. वापरा अभावी ते धुळखात पडून आहेत. यावरून पंढरपूर नगरपरिषदेचा अनागोंदी कारभार दिसून येतो, असे आरोप या निवेदनातून करण्यात आले आहेत.पंढरपूर शहरातील हे धुळीचे साम्राज्य पंधरा दिवसात नगरपरिषदेने नष्ट करावे , अन्यथा २६ जानेवारी रोजी उपोषणासारखे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा , जिल्हा ओबीसी काँग्रेसकडून देण्यात आला आहे.
जिल्हा ओबीसी काँग्रेसकडून हे निवेदन पंढरपूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना देण्यात आले. याप्रसंगी जिल्हा ओबीसी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष समीर कोळी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत मोरे , जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष नागेश गंगेकर, जिल्हा उपाध्यक्ष सुहास भाळवणकर, सरचिटणीस राजाभाऊ उराडे , पंढरपूर मंगळवेढा विधानसभा युवक अध्यक्ष बलदेव शिकलगर, वाहतूक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप तात्या फडतरे, समाजसेवक शिवाजी धोत्रे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. अशोक डोळ, मामा फलटणकर, नागनाथ अधटराव, धनंजय काकडे , देवानंद इरकल, बाळासाहेब आसबे यांच्यासह काँग्रेसचे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.