
पंढरपूर (प्रतिनिधी)
राज्यातील सरपंच आणि उपसरपंचांच्या मागण्याबाबत, मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन छेडण्यात आले होते. याबाबत राज्यातील सरपंच सेवा संघाने पुढाकार घेतला होता. सरपंचांच्या या मागण्यांबाबत, राज्य सरकार सकारात्मक असून, लवकरच मंत्रिमंडळात या मागण्यांबाबत बैठक लावण्यात येईल , असे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून सांगण्यात आले असल्याची माहिती, सरपंच सेवा संघाचे प्रमुख बाबासाहेब
पावसे यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात सरपंच आणि उपसरपंचांच्या न्याय्य हक्कासाठी सरपंच सेवा संघ कार्यरत आहे. राज्यातील सरपंच संघटनेचे नेतृत्व बाबासाहेब पावसे हे करीत आहेत. राज्यातील सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून, सरपंच आणि उपसरपंचांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्याचा प्रयत्न होत आहे. या संघाच्या माध्यमातून सरकारकडे अनेक मागण्या मांडण्यात आल्या होत्या.
सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ करावी, सरपंच पदाच्या कार्यकाळात त्यांना दहा लाखाचे विमा संरक्षण मिळावे, प्रत्येक पंचायत समितीमध्ये सरपंच, ग्रामसेवक यांची संयुक्त मासिक बैठक आयोजित करावी, सरपंचांवर हल्ला करणाऱ्यावर विशेष संरक्षण कायदा लागू करावा, राज्यातील आजी माजी सरपंच, उपसरपंच, यांचे थकीत मानधन तात्काळ वर्ग करावे, या मागण्या राज्य सरकारकडे करण्यात आल्या होत्या.
या मागण्या संदर्भात मंत्रालयात मंत्रालयाचे सचिव आणि सरपंच शिष्टमंडळाची बैठक होणार आहे. सरपंचांच्या या मागण्याबाबत सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. तरीही मागण्या मान्य होईपर्यंत, सरपंच सेवा संघाचा पाठपुरावा सुरूच राहणार आहे, अशी माहिती बाबासाहेब पावसे यांनी दिली आहे.
सरपंचांच्या या शिष्टमंडळात आदर्श सरपंच अशोक ओव्हाळ, विजय पाटील, अविनाश पवार, नंदकुमार कदम, अरुण खरमाटे, डॉ. तानाजी पाटील, सौ पूजा जाधव, जानू गायकर, लता खोट, यांच्यासह राज्यातील हजारो सरपंच या आंदोलनात सहभागी झाले होते.
हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सरपंच संजय काळे, बाबाजी गुळवे, निलेशकुमार पावसे, सोमनाथ नाडे ,रोहित पवार, अमोल शेवाळे, रवींद्र पवार, सुरेश गडाख यांनी खूप परिश्रम घेतले आहे.