
पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर शहरातील वीर सावरकर चौकात अचानक सुशोभीकरणाला सुरुवात झाली आहे. पंढरपूर नगरपालिकेने हे काम चांगलेच मनावर घेतले असून, या कामाची सुरुवात झाल्याचीही खबर येथील नागरिकांना लागली नाही. या कामास येथील व्यापाऱ्यांनी विरोध केला होता.
पंढरपूर शहरात वीर सावरकर चौकात ,अनेक वर्षापासून वाहनतळ उपलब्ध आहे. या वाहन तळाचा वापर नागरिक पार्किंगसाठी करत होते. परंतु अचानक हे काम मंजूर झाले, कामाची निविदाही निघाली, आणि सोमवारी या कामास सुरुवातही झाली. सावरकर चौकातील या वाहनतळाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या ठिकाणी तुळशी वृंदावन उभारून,यामध्ये अनेक संतांचे पुतळेही साकारण्यात येणार आहेत. पंढरपुरात प्रवेश करताना, हा चौक मध्यवर्ती आहे. या ठिकाणी सुशोभीकरण झाल्यास, पंढरी नगरीच्या सौंदर्यात मोठी भर पडणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळाही खुलणार आहे.