
पंढरपूर (प्रतिनिधी)
सांगोला विधानसभा मतदारसंघात तेरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी, हा सामना तिरंगी होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.महाविकास आघाडीचे उमेदवार दीपकआबा साळुंखे पाटील, महायुतीचे शहाजीबापू पाटील आणि शेकापचे बंडखोर उमेदवार बाबाराजे देशमुख यांच्यात तिरंगी सामना होणार असल्याचे दिसत आहे.
सांगोला विधानसभा मतदारसंघात,आजवर मोठे महाभारत घडले असून, महायुतीचे उमेदवार आ.शहाजीबापू पाटील यांचे साथीदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी अचानक शहाजीबापू पाटील यांची साथ सोडून, उद्धव ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला. महाविकास आघाडीची उमेदवारीही मिळवली , निवडणूक रिंगणात उतरलेही. ही गोष्ट आ. शहाजीबापू पाटील यांच्या पचनी पडणारी नसल्याने, दोन्ही पाटलांमध्ये मोठी लढाई जुंपली आहे.
यातच महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे, बाबाराजे देशमुख यांनी शेकापच्या चिन्हावर निवडणुकीचे मैदान गाठले आहे. यामुळे सध्याच्या विधानसभा निवडणुकीत सांगोल्यात मोठे महाभारत घडणार असल्याचे चित्र आहे.