माढा लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीतही पवारांचे धक्कातंत्र
माढ्यात अभिजीत पाटील हे राष्ट्रवादीचे उमेदवार

पंढरपूर (प्रतिनिधी)
माढा लोकसभा निवडणूक महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरून मोठी चर्चेत आली होती. अखेरच्या क्षणी राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांनी धक्का देत धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली होती, त्याचप्रमाणे माढा विधानसभा निवडणुकीतही पवारांनी मोठा धक्का दिला आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांना उमेदवारी देत, महायुतीला मोठा धक्का दिला आहे.
माढा विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांच्याकडे उमेदवारीसाठी अनेक मंडळी आग्रही होती. भाजपा आ. रणजीतसिंह मोहिते पाटील, आ. बबनदादा शिंदे, मुलगा रणजीतसिंह शिंदे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, संजय कोकाटे, यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी पवारांची पाठ सोडली नव्हती. या मतदार संघाबाबत शरद पवार यांनी खास दक्षता घेतल्याचे दिसून आले. मंगळवार दि.२९ ऑक्टोबर या शेवटच्या दिवशी, या मतदारसंघातील उमेदवाराचे नाव घोषित केले. राष्ट्रवादीचे खा. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते अभिजीत पाटील यांना राष्ट्रवादी (शप) पक्षाचा एबी फॉर्म बहाल केला. अखेर विधानसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील हे मंगळवारी सकाळी नऊ वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी खा. धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह राष्ट्रवादीची अनेक नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. माढेश्वरी देवीच्या मंदिरापासून रॅली काढत हा उमेदवारी अर्ज भरला जाणार असल्याची माहिती, अभिजीत पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे.
पवारांचे माझ्यावर प्रेम: आ. बबनदादा शिंदे
राष्ट्रवादीच्या उमेदवारी बाबत विचारले असता, आ. बबनदादा शिंदे यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. पवार साहेबांना काहीतरी अडचण असेल, मात्र त्यांचे माझ्यावर प्रेम आहे. रणजीतसिंह शिंदे यांना आपण अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरवणार असल्याचे त्यांनी सांगितले.