
पंढरपूर (प्रतिनिधी)
अनेक तीर्थयात्रा आयोजित केल्यानंतर मुस्लिम समाजाचा अजमेर दर्शन घडवून, मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांनी रविवारी बौद्ध दीक्षाभूमी सफरीचा शुभारंभ केला. सुमारे एक हजार बौद्ध बांधवांना घेऊन ही सफर पंढरपूर होऊन नागपूरला रवाना झाली. तीर्थयात्रा सहलींचे आयोजन आपण कायमच करत असून, याचा निवडणुकीची कोणताही संबंध नसल्याचे दिलीप धोत्रे यांनी याप्रसंगी सांगितले.
पंढरपूर शहरातील सारनाथ बौद्ध मंदिरात
जाऊन गौतम बुद्धांचे दर्शन घेऊन, मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी नागपूर धम्म यात्रेस हिरवा कंदील दाखवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ साली नागपूर येथे जाऊन, बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. यावेळी लाखो अनुयायी त्यांच्याबरोबर होते. त्यावेळेस पासून १४ ऑक्टोबर रोजी, नागपूर येथे जाऊन, दीक्षाभूमीचे दर्शन घेण्याची परंपरा बौद्ध समाजामध्ये आहे.
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील लहान थोर आणि वृद्धांना घेऊन ही बौद्ध धम्मयात्रा पंढरपूर हून नागपूरला रवाना झाली. यावेळी प्रत्येक गाडीमध्ये जाऊन दिलीप धोत्रे यांनी, प्रवाशांना आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी बौद्ध बांधवांनी दिलीप यांचा जयजयकार केला.
याप्रसंगी मनसेचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, शहराध्यक्ष गणेश पिंपळनेरकर, पत्रकार अभिराज उबाळे यांच्यासह मनसेचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.