नारळ फुटला ! महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ
माजी आ. प्रशांत परिचारक यांची प्रमुख उपस्थिती

पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार समाधान आवताडे यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ माचनूर येथील सिद्धेश्वर मंदिरात नारळ फोडून केला. याप्रसंगी माजी आ. प्रशांत परिचारक यांची प्रमुख उपस्थिती होती.
पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार समाधान अवताडे यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ सोमवार दि. चार नोव्हेंबर रोजी केला. यावेळी माजी आ. प्रशांत परिचारक यांनी जोरदार टोलेबाजी केली. या निवडणुकीत माझी उमेदवारी कायम राहावी, अशी अनेक जणांची इच्छा होती. यासाठी त्यांनी देवही पाण्यात ठेवले होते. परंतु पक्ष जिवंत राहिला पाहिजे, पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही असे सांगून , याचे परिणाम निवडणुकीच्या निकालानंतर दिसून येतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
आ. समाधान आवताडे यांनी मागील अडीच वर्षात केलेल्या विकासकामांच्या जोरावर आपण निवडणुकीस सामोरे जात आहोत. यापुढील काळात पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात मोठे काम करावयाचे आहे, यासाठी जनता आपल्याला नक्कीच साथ देईल ,असा विश्वास व्यक्त केला.
माचणुर येथील सिद्धेश्वर मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर , मंगळवेढा तालुक्यातील मुंढेवाडी, रहाटेवाडी, तामदर्डी, अरळी, सिद्धापूर, अरळी, नंदूर, डोणज, भालेवाडी, बोराळे असा प्रचार दौरा केला.
रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण इत्यादी मूलभूत आणि पायाभूत विकास बाबींमध्ये आ. समाधान आवताडे यांनी केलेले भरीव कार्य, त्यांना या निवडणुकीत प्लस पॉईंट ठरणार असल्याचे बोलले जात आहे.